24 February, 2019

‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी




‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा
             - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
हिंगोली दि.24 :- शेतकरी कुटुंबांना आत्मसन्मानाने जगण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अत्यंत महत्वाची असून जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.
पात्र शेतकरी बांधवाना थेट आर्थिक मदत देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही महत्वाची योजना असून या योजनेतंर्गत लाभार्थी शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यात दिले जाणार आहे. या  योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे करण्यात आला. या योजनेचा जिल्हास्तरीय लोकार्पण सोहळा येथील जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा नियोजन समिती सभागृहात मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी बोलत होते.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनीयार, निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, कृषि उपसंचालक एस. व्ही. लाडके, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे, उपविभागीय कृषि अधिकारी बळीराम कच्छवे, तहसिलदार गजानन शिंदे, तालुका कृषि अधिकारी श्री. सतिश सावंत व शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणावर  प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजना घोषित केली आहे, त्या योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यात 1 लक्ष 33 हजार 267 पात्र लाभार्थ्यी संख्या असून त्यातील एकूण 1 लक्ष 17 हजार 334 पात्र लाभार्थ्यांची नावे सदर योजनेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अपलोड करण्यात आली आहेत. तसेच उर्वरीत लाभार्थ्यांची नावे लवकरच अपलोड करण्यात येतील. या योजनेंतर्गत मिळणा-या राशीतून शेतकरी शेतीसाठी लागणारी खते, बिया, औजारे इत्यादी खरेदी करु शकतील. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीचे निराकरण करण्यास प्रशासन तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा राष्ट्रव्यापी शुभारंभ केला. त्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण जिल्हा नियोजन समिती, सभागृह येथे करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील 10 लाभार्थ्यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.    
प्रास्ताविकात उपविभागीय कृषी अधिकारी बळीराम कच्छवे यांनी या योजनेसाठी लागणारी लाभार्थींची पात्रता, स्थापन केलेल्या समित्या, पात्र यादी इत्यादी विषयी पॉवर पॉईंट प्रझेन्टेशनद्वारे सविस्तर माहिती सादर केली.
00000

No comments: