07 February, 2019

अटल महाआरोग्य शिबीराच्या पूर्वतपासणीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद 46 हजाराहून अधिक रुग्णांनी करुन घेतली पूर्वतपासणी




अटल महाआरोग्य शिबीराच्या पूर्वतपासणीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद

·   46 हजाराहून अधिक रुग्णांनी करुन घेतली पूर्वतपासणी

हिंगोली,दि.7: येणाऱ्या 10 फेब्रूवारी रोजी हिंगोली येथे आयोजित अटल महाआरोग्य शिबिरात उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी हिंगोली रेल्वे स्थानकाजवळील जागेची निवड करण्यात आली आहे. या महाआरोग्य शिबिरासाठी हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांची 3 फेब्रूवारी पासून पूर्व तपासणी सुरु झाली असून यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत हिंगोली तालूक्यातील 10 हजार तर औंढा 7 हजार, कळमनुरी 12 हजार, वसमत 9 हजार आणि सेनगाव तालूक्यात 8 हजार असे एकुण 46 हजारहून अधिक रुग्णांनी पूर्व तपासणी करुन घेतली आहे. सदर पूर्व तपासणी ही 9 फेब्रूवारी पर्यंत सुरु आहे. या महाआरोग्य शिबीरात  सुमारे एक ते सव्वा लाखाहून अधिक रुग्ण उपचाराकरीता सहभागी होण्याची शक्यता असून या दृष्टीने सर्व आवश्यक ते नियोजन करण्यात येत आहे.
या महाआरोग्य शिबीरात डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सर्व प्रकारच्या आजारांवर विनामूल्य उपचार केले जाणार आहेत. यात ॲन्जिओप्लास्टी, बायपास, सांधेरोपणापासून अन्य सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. या शस्त्रक्रियांसाठी राज्यातील नामांकित अशा सुमारे 500 डॉक्टर्स या महाआरोग्य शिबीरात उपस्थित राहून उपचार करणार आहेत. रुग्णांसाठी शिबिरात अत्याधुनिक रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहेत. महाअरोग्य शिबीर आयोजनाची पुर्वतयारीचे काम गतीने चालू असून यासाठी आवश्यक मंडप उभारणीसह व रुग्णांसाठी विविध सुविधा उपलब्ध करण्याचे कामे सुरु झाली आहेत. आवश्यक औषधी तसेच यंत्र सामुग्रीची देखील व्यवस्था करण्याचे काम सुरु आहे. येणाऱ्या रुग्णांसाठी विनामुल्य जेवण, पिण्याचे पाणी आणि वाहतूकीची देखील व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
या संधीचा लाभ घेण्यासाठी 9 फेब्रूवारीपर्यंत पूर्वतपासणी करुन घेणे आवश्यक असून, जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन अटल महाआरोग्य शिबीर समन्वय समिती मार्फत करण्यात आले आहे.

****


No comments: