18 May, 2021

कोविड-19 मुळे अनाथ, निराधार झालेल्या बालकांना महिला व बाल विकास विभागाचा मदतीचा हात

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 18 : जिल्ह्यात कोरोनामुळे दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असुन यामुळे दोन्ही  पालक गमावलेल्या  18 वर्षाच्या आतील बालकांना न्याय व हक्क मिळवून देवून त्यांचे संरक्षण, संगोपन व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी  जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  कृती दल गठीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

या संबधीचा शासन निर्णय महिला व बाल विकास विभागाकडून जारी  करण्यात आला आहे. मा.सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या बाल न्याय समिती मार्फत (JJ कमिटी) कोरोनाच्या अनुषंगाने राज्यातील बालकांची काळजी व संरक्षणासंबधी कार्य करणाऱ्या संस्थाबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकाच्या सुरक्षेबाबत जिल्हास्तरावर समिती गठीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अशी आहे जिल्हास्तरीय कृतीदल समिती

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या कृती दल समितीमध्ये संबंधित जिल्ह्याच्या क्षेत्राच्या नगर परिषदेचे मुख्याधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा विधी  सेवा प्राधिकरणाचे सचिव, बाल कल्याण समिती अध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य असुन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहणार असून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी या समितीचे सदस्य सचिव आहेत.

या कृती दलाची लवकरच बैठक घेवून जिल्ह्यातील अनाथ व निराधार मुलांचा शोध घेतला जाणार आहे. त्याअनुषंगाने कोविड काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सर्वतोपरी संरक्षण मिळावे व अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत, याची दक्षता टास्क फोर्सच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे या बालकांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून देणे, त्यांचा आर्थिक व मालमत्ता विषयक हक्क अबाधित राहील याची देखील दक्षता या समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. त्याच बरोबर चाईल्ड लाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर व सेव्ह द चिड्रेन च्या 7400015518 आणि 8308992222 या क्रमांकावर देखील अशा प्रकारच्या बालकांची माहिती सामान्य नागरिक देऊ शकतात, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी कळविले आहे.

 

****

 

No comments: