12 May, 2021

रमजान ईद सणानिमित्त मार्गदर्शक सूचना जारी

 हिंगोली, (जिमाका) दि. 12 : शासन व जिल्हास्तरावरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व रुग्णसंख्या विचारात घेता दि. 13 मे, 2021 किंवा 14 मे, 2021 (चंद्रावर अवलंबून) रोजी साजरा करण्यात येत असलेल्या रमजान ईदच्या कालावधीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी संपूर्ण जिल्ह्याच्या हद्दीत रमजान ईद साजरा करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

1. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईदसाठी मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करुन ‘ब्रेक द चेन’ आदेशाचे काटेकोर पालन करावे .

2. नमाज पठणासाठी मशिदीत, मोकळ्या जागेत अथवा इदगाहच्या ठिकाणी एकत्र येऊ नये.

3. सामान खरेदी प्रशासनाने दिलेल्या वेळेमध्येच करावी . त्या वेळे व्यतिरिक्त बाजारामध्ये सामान खरेदीसाठी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.

4. कोविड-19 या विषाणूच्या वाढत्या संसर्गास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू असल्याने तसेच रात्रीची संचारबंदी असल्यामुळे संचारबंदीच्या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरु नये.  

5. रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.

6. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते स्वयंसेवी संस्थांनी  पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी.  

7. रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

            या आदेशातील सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे. आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह हे भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहतील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांच्या विरुध्द कार्यवाही केली जाणार नाही, असेही आदेशात नमूद केले आहे.

****

No comments: