30 August, 2022

नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

 

नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका) दि.30 : विपरीत परिस्थितीत महिलांनी केलेल्या असाधारण कार्यासाठी, भारत सरकारतर्फे दरवर्षी इतिहासातील प्रतिष्ठित व प्रसिध्द व्यक्तींच्या नावे, नारी शक्ती पुरस्कार दिला जातो. सन 2022 या वर्षासाठी केंद शासनाकडून नारी शक्ती पुरस्कारासाठी नामनिर्देशन / अर्ज मागविण्यात येत आहेत.

महिलांचे आर्थिक व सामाजिक सबलीकरण, पारंपारिक व अपारंपारिक क्षेत्रात महिलांचे कौशल्य वाढविणे, ग्रामीण महिलांना सोयी सुविधा पुरविणे, विज्ञान व तंत्रज्ञान , खेळ, कला, संस्कृती, महिलांची सुरक्षा, महिलांचे आरोग्य व निरोगीपणा, महिलांचे शिक्षण, कौशल्य विकास या सारख्या अपारंपारीक क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देणे, महिलांचा आदर व प्रतिष्ठा वाढविण्यासाठी केलेले कार्य याकरिता, केंद्र शासनाकडून नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला जातो. प्रत्येक पुरस्कारासाठी भारत सरकारतर्फे रुपये दोन लाख नगद, पुरस्कार व प्रशस्तीपत्र दिले जाते.

पुरस्कारासाठी पात्रता : वैयक्तीक कार्याकरिता नारी शक्ती पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा, वैयक्तीक पुरस्कारासाठी नामांकन दाखल करणाऱ्या व्यक्तीचे वय दिनांक 1 जुलै, 2022 रोजी 25 वर्षांपेक्षा कमी नसावे, अर्जदाराला यापूर्वी लगतच्या वर्षासाठी नारी शक्ती तसेच स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नसावा.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्जदाराने अर्ज योग्य त्या कागदपत्रांसह केवळ ऑनलाईन पध्दतीने www.awards.gov.in  या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत. फक्त ऑनलाईन पध्दतीद्वारे केलेले अर्जच स्वीकारण्यात येतील. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर, 2022 ही आहे. या तारखेनंतर अर्जाची लिंक बंद होईल.

जास्तीत-जास्त महिलांनी अर्ज भरावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

****

29 August, 2022

गौरी, गणपती निमित्त अन्न पदार्थांची खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन

 

 

गौरी, गणपती निमित्त अन्न पदार्थांची

खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन

 

 हिंगोली (जिमाका) दि.29 : जिल्ह्यातील सर्व गणपती मंडळांना महाप्रसाद वाटप करावयाचा असल्यास त्यांनी अन्न सुरक्षा मानदे कायदा अंतर्गत नोंदणी करुनच महाप्रसादाचे वाटप करावे.

 तसेच गौरी, गणपती निमित्त अन्‍न पदार्थांची खरेदी करताना खबरदारी घ्यावी. मिठाईची  खरेदी करताना  ताजी असल्याची खात्री करुन घ्यावी. खरेदी केलेल्या अन्न पदार्थांचे पक्के बिल घ्यावे, परवानाधारक, नोंदणीधारक पेढीकडूनच अन्न पदार्थांची खरेदी करावी. अनोळखी व्यक्तीकडून अन्न पदार्थांची खरेदी करु नये, भडक रंग असलेली मिठाई खरेदी करु नये, खवा, मावा यापासून तयार केलेल्या मिठाईचे सेवन  24 तासांच्या आत करावे, मिठाईवर बुरशी आढळून आल्यास व मिठाई खराब झाल्याची शंका आल्यास ती सेवन न करता नष्ट करावी. उद्यड्यावरचे अन्न पदार्थ खरेदी करण्याचे टाळावे.

पॅकबंद अन्न पदार्थ खरेदी करताना बॅच नंबर, बेस्ट बिफोर दिनांक, एक्सपायरी दिनांक तपासून खरेदी करावे, खाद्यतेलाचे टिन खरेदी करताना ते गंजलेले  असल्यास खरेदी करु नये. खाद्यतेलाचे पक्के खरेदी बिल घ्यावे. यानंतरही अन्न पदार्थ, मिठाई खरेदी करताना शंका आल्यास अन्न व औषध प्रशासन, हिंगोली कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न), हिंगोली यांनी केले आहे.

0000000

26 August, 2022

 

देशाला कुपोषणमुक्त करणे व ॲनिमियाविरुध्द लढण्यासाठी फोर्टिफाईड तांदळाचे वितरण

फोर्टिफाईड तांदळामुळे बालकांना अधिक प्रमाणात पोषण मिळणार असल्याने

पालकांनी संभ्रम निर्माण करु नये

- उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : अन्न व सार्वजनिक वितरण केंद्रीय विभाग, मंत्रालय, नवी दिल्ली, भारत सरकार यांचे दि. 06 जानेवारी, 2022 रोजीचे पत्र  व मा. आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, मुंबई यांचे दि.2 फेब्रुवारी, 2022 रोजीच्या पत्रान्वये केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पोषण 2.0 अभियान अंतर्गत देशाला कुपोषणमुक्त करण्यासाठी व ॲनिमियाविरुध्द लढण्यासाठी सन 2024 पर्यंत फोर्टिफाईड तांदळाचे वितरण संपूर्ण देशात करण्यात येत आहे.

फोर्टिफाईड तांदुळ हा साध्या तांदळामध्ये सूक्ष्म पोषक घटक मिसळून तयार केलेला असतो. या मध्ये लोह, फॉलिक ॲसिड आणि जीवनसत्त्व ब-12 असल्याने शरीरास अधिक प्रमाणात पोषण मिळते. या फोर्टिफाईड तांदळाची चव, वास व शिजवण्याची पध्दत ही सामान्य तांदळाप्रमाणेच असते. फोर्टिफाईड तांदळामुळे अधिक प्रमाणात सूक्ष्म पोषक घटक असल्याने ॲनिमिया व कुपोषण यांचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. फोर्टिफाईड तांदूळ हा जरी सामान्य तांदळापेक्षा दिसण्यास काही प्रमाणात वेगळा असला तरीही, यामुळे पालकांनी घाबरुन संभ्रम निर्माण करण्याची आवश्यकता नाही. कारण त्यामुळे बालकांना अधिक प्रमाणात पोषण मिळणार आहे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व पालकांना केले आहे.

फोर्टिफाइड तांदळाबाबतची जनजागृती विभागामार्फत करण्यात आलेली आहे. तसेच नागरिक व पालकामध्ये जनजागृती करण्यासाठी व त्यांना फोर्टिफाईड तांदळासंदर्भात अधिक माहिती मिळण्यासाठी केंद्र शासनामार्फत प्राप्त झालेल्या रेडिओ जिंगल्स, संवाद गीत व शार्ट व्हिडिओ खालील लिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

 

a. Radio Jingles (National and State) in consultation with FSSAI

https://drive.google.com/drive/folders/17RKYVI6W0QMH9TeoDrXc9lhFO?usp=sharing ,

b. Social Media Collaterals :

https://drive.google.com/drive/folders/lvwzElqkohengUKqQgNtyfdeqaOghndA??usp=sharing ,

c. Short Videos on fortified rice (tw0)

https://www.dropbox.com/sh/z3rwsqdujsdrpp/AAAPIXKj-cSXFBtiqVoslRFa?dl=0

 

*****  

 

श्री गणेशोत्सव काळात डॉल्बी सिस्टीम वापरास बंदी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 :  हिंगोली शहरात व जिल्ह्यात दि. 31 ऑगस्ट, 2022 ते दि. 9 सप्टेंबर, 2022 दरम्यान मोठ्या प्रमाणात श्री गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या श्री गणेश उत्सव काळात गणेश विसर्जन दरम्यान डॉल्बी सिस्टीम लावून मिरवणुका काढण्यात येतात. या डॉल्बी सिस्टीमच्या आवाजामुळे वयोवृध्द, गरोदर महिला व लहान मुले यांना त्रास होतो. या डॉल्बी सिस्टीम चालक व यांना प्रत्येक वर्षी पर्यावरण कायदा कलम 8 देऊन मिटींगमध्ये समोपदेशन करुनही त्यांच्यावर काहीएक परिणाम झाला नसून वर्षातील शिवजयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, गणेश उत्सव, दहीहंडी, नवरात्र महोत्सव इत्यादी उत्सवामध्ये डॉल्बी सिस्टीम लावून मिरवणूका काढण्याचा प्रयत्न करतात. डॉल्बी सिस्टीम चालक व मालक हे प्रत्येक उत्सवाचे मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीम लावून पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करत आहेत. तसेच डॉल्बी सिस्टीमच्या आवाजामुळे आजारी व सर्वसामान्य नागरिक यांच्या कानास , हृदयास, आरोग्यास तसेच जिवितास धोका होण्याची शक्यता आहे. मालमत्तेची हानी सुध्दा पोहचण्याची शक्यता असल्याने सर्वांमुळे सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ध्वनी प्रदूषण नियंत्रण व नियमन करण्यासाठी मा. उच्च न्यायालय, मुंबईमध्ये दाखल जनहित याचिका क्र. 152/2010 वर न्यायालयाने वेळोवेळी आदेश देऊन ध्वनी प्रदूषण (नियंत्रण नियमन) अधिनियम 2000 तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मधील तरतुदीनुसार आदेश पारित केले आहेत. या आदेशाचे पालन करतेवेळी पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यामध्ये संघर्ष होऊन तणावाची परिस्थिती निर्माण होते. प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. या अनुषंगाने गणेश आगमन व विसर्जन मिरवणुका तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, नवरात्र, रामनवमी, दहीहंडी, शिवजयंती वेळी ध्वनी प्रदूषण अंमलबजावणी करतेवेळी आगामी नगर परिषद , जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षामध्ये गणेश मंडळांनी डॉल्बी लावावी यासाठी पाठिंबा देऊन पुढाकार घेऊ शकतात. त्यामुळे डॉल्बी लावण्यावरुन मंडळाचे पदाधिकारी, राजकीय पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी ऐनवेळी डॉल्बी सुरु करण्यासाठी हट्ट धरुन परिस्थिती तणावपूर्ण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गणेश उत्सवाच्या काळात जिल्ह्यातील डॉल्बी चालक व मालक यांच्याकडे असलेल्या डॉल्बी सिस्टीम उत्सव कालावधीत रोखून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या डॉल्बी सिस्टीम कब्जा असलेल्या ठिकाणाच्या जागेवरच सिलंबद करुन प्रतिबंध करण्यासाठी किंवा डॉल्बी सिस्टीम मालक व चालक हे डॉल्बी सिस्टीम वापरात उपभोगात आणू नये यासाठी डॉल्बी सिस्टीम मालक व चालक यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 (1) अन्वये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन दि. 31 ऑगस्ट, 2022 चे 00.00 वाजेपासून ते दि. 9 सप्टेंबर, 2022 चे 24.00 वाजेपर्यंत गणेश उत्सवाच्या काळात डॉल्बी सिस्टीम वापरात आणू नये यासाठी डॉल्बी सिस्टीम मालक व चालक यांना बंदी घातली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितावर नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार एकतर्फी  आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही आदेशात नमूद केले आहे.

*****

25 August, 2022

 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेबाबत ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली अंतर्गत दि. 30 ऑगस्ट, 2022 रोजी दुपारी 12.00 वाजता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेबाबत ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून गुगल मीटवर मोफत मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये एस.ए.कादरी, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली हे मार्गदर्शन करणार आहेत.

या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचा लाभ घेण्यासाठी meet.google.com/vkc-pyik-xsw या ऑनलाईन लिंकवर (meeting URL)  क्लिक करावे. आपल्याकडे गुगल मीट ॲप (google meet app)  यापूर्वी इन्स्टॉल केलेले नसेल तर इन्स्टॉल करुन घ्यावे. आपण गुगल मीट ॲप (google meet app)  मधून कनेक्ट झाल्यानंतर आस्क टू जॉइन (Ask to join) वर क्लिक करावे. या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे अगोदर जॉईन करावे. दिलेल्या लिंकमधून कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हिडिओ व माईक बंद (Mute) करावा. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक सुरु (unmute) करुन विचारावे व लगेच माईक बंद करण्याची दक्षता घ्यावी. प्रश्न विचारताना मोजक्या शब्दात विचारावेत. या सर्व सूचनांचे पालन करुन मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी व्हावेत.

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील उमेदवारांनी ऑनलाईन मोफत मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त , जिल्हा कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.  

*****

24 August, 2022

 

सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याठी

विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती

 

हिंगोली (जिमाका), दि. 24 :  जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात दि. 31 ऑगस्ट, 2022 ते दि. 9 सप्टेंबर, 2022 पर्यंत मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्याप्रमाणेच हिंगोली शहरात देखील सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. सण उत्सवानिमित्त जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने बंदोबस्‍त लावण्यात येतो. परंतु या सणाचे काळात मानापानाचे कारणावरुन अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अचानक निर्माण होते. अशा अचानक उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस तोंड देण्यासाठी बंदोबस्तातील अधिकाऱ्यासोबत विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची आवश्यकता असते.

त्यामुळे संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दि. 31 ऑगस्ट, 2022 ते दि. 9 सप्टेंबर, 2022 रोजी उद्भवणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी सर्व 13 पोलीस स्टेशनसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 13 विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यानी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये नियुक्ती केली आहे. 

वसमत शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी वसमतचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांची , हट्टा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अरविंद बोळंगे, कुरुंदा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे महसूल विभागाचे नायब तहसीलदार विलास तेलंग, हिंगोली शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी, नरसी नामदेव पोलीस स्टेशनसाठी हिंगोली तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी नवनाथ वगवाड, बासंबा पोलीस स्टेशनसाठी हिंगोली महसूल विभागाचे नायब तहसीलदार अनिता वडवळकर, कळमनुरी पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सुरेखा नांदे यांची, बाळापूर पोलीस स्टेशनसाठी कळमनुरी येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार पाठक यांची, औंढा नागनाथ पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी डॉ.कृष्णा कानगुले यांची, सेनगाव पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी जीवक कांबळे यांची, गोरेगाव पोलीस स्टेशनसाठी सेनगाव येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार डी. के. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वरील नियुक्ती केलेल्या दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावासमोर कार्यक्षेत्राच्या हद्दीत दि. 31 ऑगस्ट, 2022 ते दि. 9 सप्टेंबर, 2022 रोजी पर्यंत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या उपविभागावर दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे. तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या तालुक्यात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावेत, असे आदेश दिले आहेत.                                                

*****

 

जिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रास

क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा मक्ता ता.जि.हिंगोली येथे मल्टीपर्पज इनडोअर हॉलमध्ये जिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या कुस्ती प्रशिक्षण केंद्रास 5 लक्ष रुपयाच्या मर्यादेत कुस्ती क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी विविध पुरवठा धारकाकडून दि. 25 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर, 2022 पर्यंत बंद लिफाफ्यात आपापले दरपत्रक कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत.

साहित्य पुरवठा करावयाची यादी व अटी  शर्तीचे परिपत्रक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे. विहित कालावधीनंतर येणाऱ्या निविदांचा विचार करण्यात येणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी,, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय मुंढे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*****

 

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 722 मिमी पावसाची नोंद

 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 721.90 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 83.98  टक्के इतकी  पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दिनांक 24 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

हिंगोली 3.00 (782.10) मि.मी., कळमनुरी 1.00 (801.40) मि.मी., वसमत निरंक (708.80) मि.मी., औंढा नागनाथ 1.80 (660.40) मि.मी, सेनगांव 5.10 (629.10) मि.मी  पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 721.90 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

*****

 

एअर मार्शल व्ही.ए.पवार विशेष गौरव पुरस्कारासाठी

15 सप्टेंबर पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 24 : शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी बोर्डाच्या परिक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे दि. 15 सप्टेंबर, 2022 पूर्वी अर्ज सादर करावा.  

अर्जासोबत ओळखपत्राची छायांकित प्रत, चालू वर्षी शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट, इयत्ता 10 वी, 12 वी बोर्डाच्या परिक्षेच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नावे असलेल्या पानाची छायांकित प्रत, आर्थिक मदतीच्या पिवळ्या कार्डाची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, आधार कार्ड आदी कागदपत्रे सादर करावेत.

या संधीचा जास्तीत जास्त माजी सैनिक विधवांनी  लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

***** 

 

माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी

15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 24 : महाराष्ट्र शासनाच्या सैनिक कल्याण विभागामार्फत सन 2022 मध्ये इयत्ता 10 वी, 12 वी व पदवी परिक्षेत किमान 60 टक्के गुण प्राप्त करुन पुढील शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिकांच्या, विधवांच्या पाल्यासाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे.

ज्या माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांनी इयत्ता 10 वी, 12 वी मध्ये 60 टक्के गुण प्राप्त केले आहेत. अशांनी दि. 15 ऑक्टोबर, 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे अर्ज सादर करावेत.

अर्जासोबत इयत्ता 10 वी, 12 वी व पदवी गुणपत्रिकेची छायांकित प्रत, सध्या शिकत असलेल्या इयत्तेचे बोनाफाईड सर्टिफिकेट, केंद्र, राज्य शासनाची, इतर शिष्यवृत्ती मिळत नसल्याचा शाळा, महाविद्यालयाचा, संस्थेंच्या प्राचार्याचा दाखला, ज्या पाल्यांनी सीईटी, जेईई किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे, अशा पाल्यांना प्रकरणासोबत गॅप सर्टिफिकेट (स्वयंघोषणापत्र), माजी सैनिक ओळखपत्राची छायांकित प्रत, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नावे असलेल्या पानाची किंवा राशन कार्डाची छायांकित प्रत, मुलीचे वय 18 पेक्षा जास्त असल्यास मुलगी अविवाहित असल्याचा ग्रामसेवकाचा दाखला, आर्थिक मदतीच्या पिवळ्या कार्डाची छायांकित प्रत (दोन्ही बाजू), राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिलया पानाची छायांकित प्रत, आधार कार्ड आदी कागदपत्रे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

***** 

 विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांनी

विशेष गौरव पुस्कार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 24 : जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळ, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, नाट्य व इतर कला, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी, यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्य आणि पर्यावरणविषयक पुरस्कार मिळविणारे अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य तसेच शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी बोर्डात 95 टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळविलेल्या तसेच पदवी किंवा पदव्युत्तर परिक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व आयआयटी, आयआयएम व एम्स अशा नामवंत , ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक पाल्यांना सैनिक कल्याण विभागाकडून विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

विशेष गौरव पुरस्कार योजनेसाठी पात्र असलेल्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांच्या कार्यालयात उपलब्ध असलेल्या कागदपत्रांसाठी दि. 15 सप्टेंबर, 2022 पूर्वी संपर्क साधावा. येताना सोबत ओळखपत्राची छायांकित प्रत, 10 वी, बारावी बोर्डाच्या परिक्षेच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत, चालू वर्षी शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टीफिकेट, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नावे असलेल्या पानाची छायांकित प्रत, आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँक पासबूकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डची छायांकित प्रत तसेच इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचे प्रमाणपत्र घेऊन यावे.

या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****  

23 August, 2022

 

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 720 मिमी पावसाची नोंद

 

हिंगोली, (जिमाका) दि. 23 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 1.10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 719.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 83.71  टक्के इतकी  पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दिनांक 23 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

हिंगोली 1.20 (779) मि.मी., कळमनुरी 2.10 (800.40) मि.मी., वसमत 0.80 (708.80) मि.मी., औंढा नागनाथ 0.50 (658.60) मि.मी, सेनगांव 1.00 (624) मि.मी  पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 719.60 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

*****

 

मध केंद्र योजनेसाठी साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान

मधमाशापालन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 23 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. या योजनेद्वारे मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा सरक्षण व संवर्धनाची जनजागृती आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासाठी पात्र व्यक्ती व संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी जास्तीत जास्त शेतकरी, सुशिक्षित बेरोजगारांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

या योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहेत.

1. वैयक्तिक मधपाळ योजना : या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.

2. केंद्र चालक प्रगतीशील मधपाळ योजना : या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्ती वैयक्तिक केंद्र चालक असावा. शैक्षणिक पात्रता किमान 10 वी पास असावी, वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे. अशा व्यक्तींच्या नावे अथवा त्या व्यक्तीच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे किमान एक एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थीकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता व सुविधा असावी.

3. केंद्र चालक संस्था : योजनेचा लाभ घेण्यासाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नांवे मालकीची किंवा 10 वर्षासाठी भाडेतत्वावर घेतलेली किमान एक एकर शेत जमीन, संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान एक हजार चौरस फूट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता असलेली संस्था असावी.

अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, हॉल नं एस-11, नांदेड रोड, हिंगोली मो.नं. 9860537538, ई-मेल पत्ता- dviohingoli@rediffmail.com आणि संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सरकारी बंगला नं. 5 महाबळेश्वर, जि. सातारा पिन-412806 (दूरध्वनी – 02168-260264) यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी, सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

***** 

22 August, 2022

 

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

 

 

            हिंगोली (जिमाका), दि. 22 :  जिल्ह्यात दि. 31 ऑगस्ट, 2022 ते 9 सप्टेंबर, 2022 या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सवा साजरा होत आहे. या काळात विविध धार्मिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

            तसेच जिल्ह्यात विविध धार्मिक, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, शेतकरी संघटना यांच्या वतीने तसेच सद्यस्थितीत राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडीच्या अनुषंगाने विविध पक्ष, संघटना त्यांच्या मागणी संदर्भाने समर्थनार्थ अथवा विरोध प्रकट करण्यासाठी  मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे  तसेच इतर प्रकारच्या निषेध आंदोलने करीत आहेत. अशा विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा  प्रश्न निर्माण  होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 29 ऑगस्ट, 2022 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 12 सप्टेंबर, 2022 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****

 

पोळा सणाच्या कर निमित्त वाई गोरखनाथ मार्गावरील

वसमत-औंढा रोडवरील वाहतूक मार्गात बदल

 

हिंगोली (जिमाका), दि.22 : प्रतिवर्षाप्रमाणे दि. 26 ऑगस्ट, 2022 रोजी पोळा हा सण साजरा करण्यात येणार असून दि. 27 ऑगस्ट, 2022 रोजी कर हा सण साजरा करण्यात येत आहे. या कर सणानिमित्ताने कुरुंदा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाई येथील गोरखनाथ मंदिरास हिंगोली, लातूर, परभणी व नांदेड जिल्ह्यातील जवळपास 25 हजार ते 30 हजार बैलजोड्या दर्शनास व प्रदक्षिणा मारण्यासाठी बैलाचे मालक घेऊन येतात. त्यामुळे वसमत-औंढा रोडवर बैलांची व बैल फिरविण्यासाठी आणणाऱ्या लोकांची बरीच गर्दी होते. हा रस्ता राज्य महामार्ग  असल्याने सदर रोडवर वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू असते व या दिवशी वाहतूक चालू राहिल्यास अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने वसमत टी पॉईंट ते नागेशवाडी पर्यंत रहदारीचा रस्ता हा दि. 26 ऑगस्ट, 2022 चे 00.00 ते दि. 27 ऑगस्ट, 2022 रोजीचे 24.00 वाजे पावेतो बंद करण्यात येऊन नांदेडकडून येणारी वाहतूक वसमत, झिरो फाटा, हट्टा जवळा बाजार मार्गे नागेशवाडी असे पर्यायी मार्गाने औरंगाबादकडे व औरंगाबादकडून नांदेडकडे जाणारी वाहतूक ही नागेशवाडी, जवळा बाजार हट्टा, झिरो फाटा मार्गे वसमत ते नांदेडकडे वळविण्यासाठी आदेश होण्यास विनंती केली आहे.  

पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या अहवालानुसार सदर रस्ता हा राज्य महामार्ग असल्याने रोडवर वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू असते. या दिवशी वाहतूक चालू राहिल्यास अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने रस्ता वळविणे आवश्यक आहे.

त्यामुळे जिल्हादंडाधिकारी हिंगोली यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ख) अन्वये प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन वसमत टी पाईंट ते नागेशवाडी पर्यंत रहदारीचा रस्ता हा               दि. 26 ऑगस्ट, 2022 चे 00.00 ते दि. 27 ऑगस्ट, 2022 रोजीचे 24.00 वाजे पावेतो बंद करण्यात येऊन नांदेडकडून येणारी वाहतूक वसमत, झिरो फाटा, हट्टा जवळाबाजार मार्गे नागेशवाडी असे पर्यायी मार्गाने औरंगाबादकडे व औरंगाबादकडून नांदेडकडे जाणारी वाहतूक ही नागेशवाडी, जवळा बाजार, हट्टा, झिरो फाटा मार्गे वसमत ते नांदेडकडे वळविण्यात आले आहे.

या आदेशाची माहिती पोलीस अधिकारी वाहतूक यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे प्रसिध्द करावी व सर्व उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार, नगर परिषद, पोलीस स्टेशन कार्यालयाचे नोटीस बोर्डावर डकवून प्रसिध्दी देण्यात यावी. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द नियमानुसार कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

******

19 August, 2022

 

आरोग्य विभागाची आढावा बैठक संपन्न

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथरोग होऊ नये

याबाबत सर्वांनी सतर्कता बाळगावी

- मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने

 



हिंगोली (जिमाका), दि.19 : जिल्हा प्रशिक्षण केंद्र हिंगोली येथे आज मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व सर्व जिल्हा समन्वयक यांची आढावा बैठक घेण्यात आली.

यामध्ये राष्ट्रीय कार्यक्रमनिहाय आढावा घेण्यात आला. कुष्ठरोग कार्यक्रमाबाबत सविस्तर आढावा घेतला व नवीन कुष्ठरुग्ण शोधून त्यांना लवकर उपचाराखाली आणणे तसेच माहे सप्टेंबर मध्ये जिल्ह्यात दि.13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान कुष्ठरोग शोध व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येणार असल्याचे डॉ.सुनील देशमुख यांनी सांगितले. त्यानंतर हिवताप रुग्णाबाबत आढावा घेण्यात आला. यामध्ये आरोग्य कर्मचारी यांना गृहभेटी दरम्यान तापीच्या रुग्णाचे रक्त नमुने घेऊन त्यांना उपचार द्यावा. तसेच संशयित  डेंग्यू रुग्ण आढळून आल्यास तात्काळ रक्तजल नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात यावेत व प्रतिबंधात्मक उपाय योजना करावे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या तापीच्या रुग्णाचे रक्त नमुने घ्यावेत व उपचार द्यावा व संसर्गजन्य आजाराबाबत आढावा घेण्यात आला. तसेंच प्राथमिक आरोग्य केंद्र , उपकेंद्र स्तरावर प्रसूतीचे प्रमाण वाढवावे. नियमित लसीकरण हे नियोजित ठिकाणी नियोजित वेळेत करावे. ते कोणत्याही परिस्थितीत रद्द करण्यात येऊ नये, बाह्यरुग्ण विभागामध्ये येणाऱ्या रुग्णांना गुणात्मक व दर्जेदार आरोग्य सेवा द्यावी, कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करावे, तसेच आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने कोविड-19 लसीकरण व बूस्टर डोस नागरिकांना देण्यात यावेत, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे साथरोग होऊ नये याबाबत सर्वांनी सतर्कता बाळगावी. सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयास राहावे. भेटी दरम्यान गैरहजर आढळून आल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.सचिन भायेकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास  शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सतीश रुणवाल, डॉ.नामदेव कोरडे, डॉ.संदीप काळे, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे डॉ. देवेंद्र जायभाये, डॉ.सुनील देशमुख, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश जाधव, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, कमलेश ईशी, श्रीमती वडकुते, अनिता चव्हाण, आरोग्य सहाय्यक डी. आर. पारडकर, अमोल कुलकर्णी, संदीप मुरकर, अजहर अल्ली, बापू सूर्यवंशी, मुनाफ आदी उपस्थित होते.

******

 शेतकरी उत्पादक कंपनीनी गोदाम बांधकाम अनुदानासाठी अर्ज करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि.19 : विविध केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल तेल अभियान अंतर्गत सन 2022-23 या योजनेअंतर्गत 250 मे.टन क्षमतेचे गोदाम बांधकाम या बाबीसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12 लाख 50 हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे. ही बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छूक शेतकरी उत्पादक संघ/कंपनी यांनी अर्ज सादर करावा.

यासाठी वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषानुसार डिझाईन, स्पेसिफिकेशन, खर्चाचे अंदाज पत्रकाप्रमाणे बांधकाम या आर्थिक वर्षात पूर्ण करणे बंधनकारक आहे. गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषिमाल साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना योग्य व माफक दर आकारुन करावा. याबाबत 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज्ड हमीपत्र आवश्यक आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा, आधारकार्ड व बँक खात्यांचा तपशील इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाकडे दि. 30 सप्टेंबर 2022 पूर्वी सादर करावेत. पूर्वसंमती देण्यात आलेल्या कंपन्यांनी बांधकाम पूर्ण केल्यानंतर त्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान शेतकरी उत्पादक कंपनी/संघ यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर पध्दतीने वर्ग करण्यात येईल.

या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उत्पादक संघ/कंपनी यांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषि विभागाच्या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

******

 एकात्मिक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापन निविष्ठांच्या अनुदानाचा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि.19 : विविध केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल तेल अभियान अंतर्गत पिकांसाठी सन 2022-23 या योजने अंतर्गत खरीप व रब्बी अंतर्गत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापन या बाबीसाठी पिक संरक्षण औषधे, तणनाशके, जिप्सम, जैविक खते, जैविक कीड नियंत्रण या निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना किंमतीच्या 50 टक्के कमाल 500 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मर्यादेत लाभ देय आहे.

सध्या खरीप हंगामातील पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांना कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार निविष्ठा खरेदी केल्यास राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल तेल अभियान सन 2022-23 उत्पादन वाढीसाठी निविष्ठा पुरवठा घटक-प्रकल्पा बाहेरील या बाबीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खालीलप्रमाणे अनुदान अनुज्ञेय आहे.

सूक्ष्म मुलद्रव्ये, जिप्सम, जैविक खताच्या एकूण किमतीच्या 50 टक्के कमाल 500 रुपयाच्या मर्यादेत 2 हेक्टर क्षेत्रासाठी देय आहे. तसेच पिक संरक्षण औषधे, तणनाशके, जैविक कीड नियंत्रण इत्यादी किंमतीच्या 50 टक्के किंवा कमाल 500 रुपये हेक्टर देय आहे. एका शेतकऱ्याला कमाल 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वरील निकषानुसार निविष्ठा खरेदी करुन त्याची खरेदी पावती , सातबारा, आधारकार्ड व बँक खात्यांचा तपशील इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाकडे खरीप हंगामासाठी दि. 15 सप्टेंबर 2022 पूर्वी व रब्बी हंगामासाठी दि. 30 डिसेंबर 2022 पूर्वी सादर करावेत. त्यानुसार त्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर पध्दतीने वर्ग करण्यात येईल. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

******

18 August, 2022

 

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिवस साजरा



 

हिंगोली (जिमाका), दि.18 : भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषाविषयक भेद न करता सर्वांनी सामंजस्याने कार्य करणे आणि अहिंसा व संविधानाच्या मार्गाने मतभेद सोडविण्याचा प्रयत्न करण्यासंदर्भातील सदभावना दिवसाची प्रतिज्ञा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना दिली.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासकीय इमारतीतील अधिकारी, कर्मचारी यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन सामुहिक प्रतिज्ञा घेतली.

******  

17 August, 2022

 

निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार

क्षेत्रीय डाक जीवन विमा अधिकारी म्हणून काम करण्याची संधी

 

हिंगोली, (जिमाका) दि. 17 :  परभणी डाक विभागाकडून डाक जीवन विमा (PLI) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) योजनेअंतर्गत "क्षेत्रीय डाक जीवन  विमा अधिकारी’’  (Field Officer)  म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत.

इच्छूक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज दि. 30 ऑगस्ट, 2022 रोजी कार्यालयीन वेळेत (11.00 17.00) अधीक्षक डाकघर, परभणी विभाग, परभणी- 431401 येथे थेट मुलाखतीसाठी हजर राहावे व सोबत बायोडाटा, मूळ कागदपत्र, प्रमाणपत्र/सेवामुक्ती प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे.

यासाठी उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 65 वर्ष असावे. अर्जदार हा केंद्र किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही खात्याचा निवृत्त अधिकारी, कर्मचारी असावा. तसेच त्याच्यावर कुठल्याही प्रकारची विभागीय, शिस्तभंगाची कारवाई चालू नसावी. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विमा बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती आदी बाबींचे ज्ञान तपासले जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपये अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी NSC/KVP च्या स्वरुपात असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. जो IRDA ची परवाना परीक्षा उतीर्ण केल्यानंतर कायम स्वरुपाच्या परवानामध्ये रुपांतरीत केली जाईल. ही परीक्षा 3 वर्षाच्या आत उतीर्ण करणे अनिवार्य राहील. उमेदवाराची नियुक्ती ही लायसन्स तत्वावर आणि कमिशन तत्वावर राहील, असे डाकघर अधीक्षक, परभणी विभाग, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

******

 

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा आयोजनाची कार्यवाही सुरु

- सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य मंत्री

 

हिंगोली, (जिमाका) दि. 17 :  शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धांच्या कार्यवाहीस सुरुवात झाली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. दि. 15 नोव्हेंबर, 2022 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे

याबाबत संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, दिनांक 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर, 2022 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. 61 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक 15 नोव्हेंबर, 2022 पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच 61 व्या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी 01 जानेवारी 2023 पासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच 19 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची स्पर्धेची प्राथमिक फेरी 01 जानेवारी 2023 पासून 10 केंद्रांवर आयोजित करण्यात येणार असून दिव्यांग बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी फेब्रुवारी 2023 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी दिली आहे.

           नाट्य स्पर्धेसाठी 03 हजार रुपये इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष, तर बालनाट्य स्पर्धेसाठी 01 हजार रुपये  इतक्या रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल.

            नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या www.mahasanskruti.org या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळयाखाली उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. 15 सप्टेंबर, 2022 पर्यंत खालील पत्त्यावर सादर कराव्यात.

1) मुंबई, कोकण व नाशिक विभागातील संस्थांनी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-32 (022-22043550) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

2) पुणे महसूल विभागातील संस्थांनी, सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, बंगला क्रमांक-4, विमानतळ रोड, पुणे (7579085918) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

3) औरंगाबाद महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, रुम नंबर-02, एमटीडीसी बिल्डिंग, गोल्डी टॉकीजच्या समोर, स्टेशन रोड, औंरगाबाद-431005 (08788893590) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात. 

4) नागपूर व अमरावती महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, द्वारा : अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय, अस्थायी प्रदर्शन हॉल, तळमजला, सिव्हिल लाईन, नागपूर-440001 (0712-2554211) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

        विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशील भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल. प्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची सर्व स्पर्धक संस्थांनी कृपया नोंद घ्यावी.

         स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेसाठी संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल. 

           राज्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

*****