महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता
यात्रेमध्ये सहभाग नोंदवावा
हिंगोली,
(जिमाका) दि. 04 : विविध क्षेत्रात
कार्यरत असलेल्या नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कौशल्य विकास
रोजगार व उद्योजकता विभागामार्फत महाराष्ट्र राज्य नाविण्यपूर्ण स्टार्टअप धोरण-2018
जाहीर केले आहे.
या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील
नाविण्यपूर्ण परिसंस्थेच्या अध्ययन आणि विकासासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी
कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सोसायटीमार्फत विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम
राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून नवोदित उद्योजकांच्या कल्पनांना पोषक वातावरण पूरवून
त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या स्टार्टअपची स्वप्ने साकार करण्यासाठी
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे
आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या तळागाळातील नवउद्योजकांना आणि नाविन्यपूर्ण
कल्पनांचा शोध घेऊन त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, नवसंकल्पनांना
तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि
आवश्यक पाठबळ पुरविणे तसेच राज्यातील परिसंस्था बळकट करणे ही या स्टार्टअप यात्रेची
ठळक वैशिष्ट्ये आहेत.
ही स्टार्टअप यात्रा हिंगोली जिल्ह्यामध्ये दि.
20 ऑगस्ट रोजी कळमनुरी, हिंगोली, औंढा नागनाथ येथे, दि. 26 ऑगस्ट रोजी वसमत येथे आणि
दि. 2 सप्टेंबर रोजी सेनगाव अशाप्रकारे सर्व तालुक्यांमध्ये येणार आहे. त्याचबरोबर
दि. 14 सप्टेंबर, 2022 रोजी जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर आणि सहभागी स्टार्टअप्सचे
सादरीकरण सत्र होणार आहे. या सादरीकरण सत्रामध्ये
नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय कृषी , शिक्षण, सेवा, कचरा
व्यवस्थापन, पाणी, स्वच्छ ऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण
कल्पना उद्योगांचे सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर करण्याची संधी दिली जाईल.
पहिल्या तीन उत्कृष्ट सादरीकरणास अनुक्रमे 25 हजार, 15 हजार आणि 10 हजार रुपये असे
पारितोषिक देण्यात येईल. त्याचबरोबर त्यांना राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळणार
आहे.
नाविन्यतापूर्ण कल्पना व उद्योग सादरीकरण करण्यास
इच्छूक असलेल्या नागरिकांनी आपल्या नाविन्यतापूर्ण कल्पना व उद्योगांबाबतचे अर्ज आपल्या
नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सादर करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा
कौशल्य विकास समन्वयक महेश राऊत (मो.क्र.9028945757) यांना संपर्क साधावा. या यात्रेमध्ये
जास्तीत जास्त नवोदित उद्योजकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ.रा.म. कोल्हे, सहायक
आयुक्त , कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment