16 August, 2022

  दि.17 ऑगस्ट ला सकाळी 11 वाजता होणाऱ्या समूह राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्वानी उत्साहात सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन


 हिंगोली, दि.16 (जिमाका) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात "स्वराज्य महोत्सव" अंतर्गत उद्या सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. खाजगी, शासकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा / महाविद्यालये / शैक्षणिक संस्था / विद्यापीठे यामधील विद्यार्थी, शिक्षक यांचा सहभाग अनिवार्य असून हिंगोली जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

    भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्ताने दि.9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीमध्ये स्वराज्य महोत्सव सुरू आहे. या अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम उद्या दि.17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र उद्या सकाळी 11 वाजता या एकाच वेळी नागरिकांनी आहे त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहून राष्ट्रगीत गायन करावे.  सकाळी 11.00  ते 11.01 या एका मिनिटांमध्ये राष्ट्रगीत गायन करणे अपेक्षित आहे, याची सर्व संबधितांनी दक्षता घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

       समूह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी जाणते-अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये, याची सर्वांनीच दक्षता घेणे तसेच खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था, शासकीय व निम शासकीय कार्यालये, केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधित कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी यांनीही या उपक्रमात सक्रीय सहभाग घेणे अपेक्षित आहे.

       राष्ट्रगीत गायनासाठी विद्यार्थ्यांनी मोकळे पटांगण, वर्ग खोली, किंवा हॉल या ठिकाणी एकत्रित उपस्थित राहावे. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभागी व्हावे.  ग्राम स्तरावर, वॉर्ड स्तरावर (नगरपालिका/ नगरपरिषद/ नगरपंचायत / महानगरपालिका स्तरावर), सर्व प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

     तरी जिल्ह्यातील विद्यार्थी, नागरिकांनी उद्या दि.17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीत गायन उपक्रमात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. 

0000000

No comments: