विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त प्रदर्शनाचे आयोजन
नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 13 : देशाला सन 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. याच्या अगोदर फाळणीमुळे अनेक नागरिकांना विस्थापित व्हावे लागले, अनेकांना प्राण गमवावे लागले, अनेकांवर अत्याचार झाले. फाळणीतील लाखो भारतीय विस्थापितांनी दिलेल्या बलिदानाचे, सहन केलेल्या अत्याचार, दु:ख, वेदना, संवेदना लोकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त येथील महावीर भवनच्या सभागृहात प्रदर्शन भरविण्यात येत आहे. हे प्रदर्शन दि. 14 व 15 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 9.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
विभाजन विभीषिका स्मृती दिवस या दिनी देशाच्या फाळणीत बळी पडलेल्या लाखो लोकांवर झालेले अत्याचार, त्यांच्या वेदना तसेच विस्थापित झालेल्या लोकांचे दु:ख लोकांसमोर मांडले जावे ही या मागची संकल्पना आहे. फाळणीग्रस्त जनतेच्या वेदनेचे प्रदर्शन करण्यासाठी इंडियन कॉन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्टस यांनी संयुक्तपणे प्रदर्शन भरविलेले आहे. हे प्रदर्शन इंग्रजी व हिंदी मध्ये डिजीटल स्वरुपात https://amritmahotsav.nicin/partition-horror-remembrance-day.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
******
No comments:
Post a Comment