11 November, 2025
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील 5 शाळांमध्ये वाचनालय व ग्रंथालय सुरू करण्याचे निर्देश – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• भाषा-गणित मित्र अभियान राबवा- जिल्हाधिकारी
हिंगोली (जिमाका), दि. 11 : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीचा विकास करण्यासाठी वाचनालय व ग्रंथालय तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रुमची सुविधा असलेल्या पाच शाळांची यादी उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी न्यास व एनसीईआरटी आधारित मराठी, गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांवरील प्रश्नसंच तयार करण्यात यावेत. विद्यार्थ्यांचा पायाभूत शैक्षणिक विकास साधण्यासाठी पायलट प्रकल्प राबवावा, अध्ययन निश्चिती करावी, तसेच गणित, विज्ञान व भाषा विषयांमध्ये गुणवत्तावृद्धीसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाच्या सुकाणू समितीची बैठक पार पडली. यावेळी शिक्षणाधिकारी आसावरी काळे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी सुनिल बारसे तसेच सुकाणू समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, शाळांमध्ये गुणवत्तावृद्धीसाठी भाषा समृद्धी अभियान व गणित समृद्धी अभियान प्रभावीपणे राबवावे. विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेचा विकास, प्रश्नसंचाच्या सरावाद्वारे संकल्पनात्मक आकलन वाढविणे, तसेच शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीत नवकल्पना आणणे यावर विशेष भर द्यावा.
या बैठकीत शिक्षण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेऊन जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेच्या उन्नतीसाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
भाषा-गणित मित्र अभियान राबवा- जिल्हाधिकारी
हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या मराठी व इंग्रजी भाषा आणि गणित विषयातील पायाभूत कौशल्ये व क्षमता विकसित करण्याच्या हेतूने भाषा-गणित मित्र अभियान राबवा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत.
या अभियानात इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयातील पायाभूत क्षमता आत्मसात करण्यास मदत करणे, इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात इंग्रजी भाषेचा प्रभावी वापर करण्यास सक्षम बनविणे, इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेवर प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी मदत करणे हे या अभियानाची उद्दिष्टे आहेत.
अभियानाची वैशिष्ट्ये : इयत्ता 1 ली ते 10 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना भाषा व गणित विषयातील पायाभूत कौशल्ये व क्षमता विकसन तसेच कार्यात्मक प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी एकूण 30 घड्याळी तासांचे कार्यक्रम तयार करण्यात आले आहे. या अभियानात प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या किमान 300 शब्दसंपत्ती विकसनासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची वाचन, भाषण, संभाषण व लेखन कौशल्ये विकसनासाठी काही बेंचमार्क्स ठरविण्यात आले असून या अभियानात शिक्षकांच्या मदतीने साध्य करायचे आहे. विद्यार्थ्यांना गणिती क्षमतांचा वापर दैनंदिन जीवनात करण्यासाठी कृतींचे विकसन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना सरावासाठी एका प्रश्नपेढीचे विकसन करुन देण्यात येत आहे.
अभियानाच्या अंमलबजावणीचे स्वरुप : या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडक शाळांमध्ये हे अभियान राबविले जाणार आहे. दररोज 30 मिनिटे सराव देऊन एकूण 10 आठवड्यांच्या कालावधीत अपेक्षित उद्दिष्टे साध्य केली जातील. अभियान अंमलबजावणी सुरु असताना शाळा भेटीच्या माध्यमातून सर्व पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांच्या मार्फत सनियंत्रण केले जाणार आहे. 10 आठवड्यांच्या कालावधीनंतर शाळाभेटी करुन विद्यार्थ्यांच्या संपादणुकीची पडताळणी करण्यात येणार आहे. पथदर्शी अंमलबजावणीनंतर कार्यक्रमाची यशस्वीता पडताळून जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर शाळांमध्ये सदर अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिली.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment