25 November, 2025
शेतक-यांनी आधारभूत दरानुसार मूग उडीद व सोयाबीन खरेदी योजनेच्या लाभासाठी दलालांच्या अमिषाला बळी पडू नये-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी घेतली आढावा बैठक
हिंगोली (जिमाका), दि. 25 : शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग उडीद व सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घेण्याकरिता कोणत्याही दलाल किंवा मध्यस्थांच्या अमिषाला बळी पडू नये. आपले मूग उडीद व सोयाबीन देऊ नये किंवा त्यांच्यामार्फत कुठलाही व्यवहार करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ व एनसीसीएफ यांची यांची जिल्ह्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार एनसीसीएफमार्फत मूग उडीद व सोयाबीन खरेदीकरिता आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पणन महासंघाचे कुंडलीक शेवाळे, कृषी पणन मंडळाचे दिगंबर शिंदे, वखार महामंडळाचे व सीसीआयचे अधिकारी तसेच जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे 7 व महाराष्ट्र राज्य कृषि पणनच्या 11 खरेदी केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ व एनसीसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम 2025-26 साठी हिंगोली जिल्ह्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार एनसीसीएफमार्फत मूग उडीद व सोयाबीन खरेदीकरिता शेतकरी नोंदणी दि.30 ऑक्टोबर 2025 रोजी सुरू करण्यात आली असून प्रत्यक्षात खरेदी प्रक्रिया पणन महासंघाकडून 7 खरेदी केंद्रावर दि.15 नोव्हेंबर 2025 पासून सुरू करण्यात आली आहे. तसेच कृषी पणन मंडळाकडून 2-3 दिवसामध्ये सुरू होणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले की, ज्येष्ठ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर न येण्यासाठी सवलत आहे. मात्र त्यांनी प्रतिनिधी म्हणून आपल्या कुटुंबातील सदस्यामार्फत नामनिर्देशन करून शेतमाल जमा करावा. स्वत: शेतकरी नोंदणी करण्यासाठी शासनाने ई- समयमुक्ती अँपवर नोंदणी करावी. सर्वसाधारणपणे 3 दिवसात शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पैसे त्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर जमा होतील. सर्व खरेदी केंद्रांना जास्तीत जास्त एसएमएस सोडून सोयाबीन खरेदी करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान केंद्र शासनाने मूग उडीद व सोयाबीन खरेदीकरिता मूग 8768 रुपये प्रति क्विंटल, उडीद 7800 रुपये प्रति क्विंटल व सोयाबीन 5328 रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केले आहेत. शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग उडीद व सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घेण्याकरिता आपल्या शेतमालाची (सरासरी दर्जा) नुसार नजीकच्या प्रतवारी केंद्रावरून प्रतवारी करून घेऊनच आपला एफएक्यू दर्जाचा शेतमाल खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा. ज्यामुळे शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी मदत होईल, असे सांगितले.
सोयाबीन साठी शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार पुढीलप्रमाणे फक्त एफएक्यू (सरासरी दर्जा) माती, काडी, कचरा व बाह्य पदार्थ डागी 2 टक्के, चिमलेले, अपरिपक्व व रंगहीन – 5 टक्के, कीड किंवा भुंगा लागलेले दाणे – 3 टक्के, मशीनने तुटलेले, भेगा पडलेले -15 टक्के व ओलावा -12 टकके शेतकऱ्यांनी मूग उडीद व सोयाबीन विक्री करिता आपल्या गावाजवळील एनसीसीएफच्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन किंवा एनसीसीएफने तयार केलेल्या ई-समयमुक्ती मोबाईल अँपवरून करावी. नोंदणीसाठी ई-पीक पाहणी केलेला सातबारा उतारा, आधारकार्ड व पासबुक घेऊन प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी. ही नोंदणी पॉस मशीनद्वारे करण्यात येणार असल्यामूळे प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. संपूर्ण खरेदीचा आढावा घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी खरेदीकरिता आपणास एसएमएस प्राप्त झाल्यानंतर शेतमाल खरेदी केंद्रावर घेऊन यावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सदरील योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
या आढावा बैठकीमध्ये वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठा साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच कापूस खरेदीचाही आढावा घेतला.
**
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment