07 November, 2025

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या नव्याने तयार करण्यात येणाऱ्या मतदार यादीच्या संदर्भात महत्वाचा खुलासा

हिंगोली(जिमाका), दि. 07 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर विधान परिषद मतदार संघाची मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम सुरु आहे. मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून दि. 6 नोव्हेंबर, 2025 पर्यंत प्राप्त झालेल्या मतदारांची प्रारुप मतदार यादी दि. 25 नोव्हेंबर, 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच प्रारुप यादीबाबत दावे व हरकती सादर करण्यास संधी देऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यांनतर दि. 30 डिसेंबर, 2025 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तथापि, विधान परिषदेच्या या जागा डिसेंबर-2026 मध्ये रिक्त होणार आहेत. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 मधील तरतुदीनुसार मतदार याद्यामध्ये संबंधित निवडणुकांकरिता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत सुधारणा, नव्याने समावेशन किंवा वगळणी करता येते. उपरोक्त नमूद पदवीधर विधान परिषद मतदार संघाच्या मतदार याद्या दि. 30 डिसेंबर, 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतरही त्या याद्यांमध्ये ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने नव्याने नाव समाविष्ट करण्याची संधी पात्र मतदारांना संबंधित विडणुकांच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत उपलब्ध असणार आहे, अशी माहिती 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. *******

No comments: