28 November, 2025
मत्स्यव्यवसाय घटक योजनेसाठी अर्ज मागविण्याबाबत सूचना
• धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान
हिंगोली(जिमाका), दि. 20 : हिंगोली जिल्ह्यातील धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या सहयोजनेअंतर्गत मत्स्यव्यवसाय संबंधित घटक योजनेकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता समाविष्ट गावांतील अनुसूचित जमातीमधील इच्छुक अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, याबाबतची जाहिरात दि. 20 नोव्हेंबर, 2025 नुकतीच प्रसारमाध्यमात प्रसिध्द करण्यात आली आहे.
प्रसिद्ध जाहिरातीतील अटींनुसार अर्जदारांनी त्यांच्या प्रवर्गाची खातरजमा करण्यासाठी जातीचा दाखला तसेच जात वैधता प्रमाणपत्र संलग्न करणे अपेक्षित आहे. तथापि, अनेक अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याची बाब लक्षात घेता, योजनेपासून कोणताही पात्र अर्जदार वंचित राहू नये म्हणून पर्यायी दस्तऐवज मान्य करण्यात आले आहेत.
अर्जदारांकडे जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला जातीचा दाखला, आदिवासी वन पट्टाधारक असल्याबाबतची सातबारा नोंद, आदिवासी सामूहिक वन संसाधन धारक असल्याचे दस्तऐवजीकरण, संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र यापैकी कोणताही दस्तऐवज जातीच्या पुराव्यासाठी मान्य राहील.
या योजनेकरिता सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय हिंगोली येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment