11 November, 2025
हिंगोली जिल्ह्यात “सेवादूत” प्रणालीमुळे नागरिकांना घरबसल्या शासकीय सेवा
• जिल्ह्यातील सर्व विभागांना वेळेवर सेवा देण्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांचे निर्देश
हिंगोली (जिमाका), दि. 11 : हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय विविध विभागांच्या सेवा विनासायास आणि वेळेत मिळाव्यात या उद्देशाने पालकमंत्री महोदयांच्या हस्ते दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी “सेवादूत” प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला आहे.
या प्रणालीद्वारे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत येणाऱ्या अधिसूचित सेवांच्या सर्व ऑनलाइन अर्जांची नोंदणी नागरिक आता अधिक सुलभ पद्धतीने करू शकतात. नागरिकांना अर्ज करण्यासाठी व्हॉटस्अप क्रमांक 9403559494 तसेच संकेतस्थळ www.sewadoothingoli.in वरून किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामार्फत अपाईटमेंट (Appointment) बुक करून अर्ज करता येतो.
“सेवादूत हिंगोली” प्रणालीद्वारे नागरिकांना योग्य मार्गदर्शन, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि सेवा/प्रमाणपत्र घरपोच उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व “आपले सरकार सेवा केंद्र” चालकांना ग्रामपंचायत, नगरपालिका तसेच मनपा स्तरावर विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
या प्रणालीमार्फत प्राप्त होणाऱ्या विविध विभागांच्या अर्जांचा विहित वेळेत व प्राधान्याने निपटारा करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. अर्जामध्ये त्रुटी आढळल्यास त्याबाबतचे कारण स्पष्टपणे नमूद करावे, अशी सूचना संबंधित कार्यालयांना देण्यात आली आहे.
“सेवादूत हिंगोली” प्रणालीमुळे नागरिकांना शासनाच्या सेवा आता त्यांच्या घरपोच आणि वेळेत उपलब्ध होत असून, प्रशासनात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढीस लागली आहे.
सर्व शासकीय विभागांनी आपल्या कार्यक्षेत्रातील यंत्रणांना तत्काळ सेवा व प्रमाणपत्र निर्गमित करण्यास सांगावे. तसेच आठवड्याला प्राप्त अर्जांचा आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या आहेत.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment