26 November, 2025

रब्बी हंगामासाठी इसापूर धरणातून तीन आवर्तने देण्यास मंजुरी

• पहिले आवर्तन 15 डिसेंबर ते 4 जानेवारी 2026 हिंगोली (जिमाका), दि. 26 : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत रब्बी हंगामासाठी इसापूर धरणातून तीन आवर्तने सोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कालवा सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पहिले आवर्तन 15 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत सोडण्याचे ठरले असून, प्रत्येक आवर्तनाचा कालावधी 20 दिवसांचा असेल. शेतकऱ्यांनी या नियोजनाचा वेळेत लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाचे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी केले आहे. समितीच्या बैठकीत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी तातडीने पाणी सोडण्याची विनंती केली होती. त्यानुसार तीन आवर्तनांचे नियोजन करण्यात आले आहे. पहिले आवर्तन 15 डिसेंबर ते 4 जानेवारी, दुसरे आवर्तन 8 जानेवारी ते 28 जानेवारी आणि तिसरे आवर्तन 5 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सोडण्यात येणार आहे. पावसाळी किंवा आकस्मिक परिस्थितीनुसार तारखेत आवश्यक बदल करण्यात येऊ शकतात. दि. 15 ऑक्टोबर 2025 रोजी धरणातील उपलब्ध 100 टक्के जिवंत पाणीसाठ्यावर आधारित रब्बी व उन्हाळी हंगामाचे प्राथमिक नियोजन तयार करण्यात आले आहे. उन्हाळी हंगामासाठी स्वतंत्रपणे पुढील बैठक घेऊन मान्यता दिली जाणार आहे. इसापूर प्रकल्पाच्या डावा व उजवा कालवा आणि त्याअंतर्गत वितरण व्यवस्थेद्वारे प्राप्त मागणीनुसार पाणी पुरवठा केला जाईल. सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास लाभधारकांनी नमुना क्र. 7 व 7-अ मधील पाणी मागणी अर्ज शाखा कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. हंगामी व दुहंगामी पिकांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत. अर्जासोबत उपसा परवानगीची प्रत, अपत्य प्रमाणपत्र, तसेच अल्प किंवा अत्यल्प भूधारक असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. शेतातील शेतचारी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांची असेल. तांत्रिक कारणास्तव पाणीपुरवठ्यात अडचण आल्यास विभाग जबाबदार राहणार नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास मंजुरी रद्द करण्यात येईल. सर्व लाभधारकांनी महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम व विभागीय नियमांचे पालन करावे, असेही आवाहन कार्यकारी अभियंता श्री. जगताप यांनी केले आहे. *****

No comments: