15 November, 2025

आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी मोबाईलचा सकारात्मक वापर करावा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

• भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त हिंगोली येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन हिंगोली (जिमाका), दि. 15 : भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जावे. यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा सकारात्मक वापर करून अभ्यास व पुस्तके वाचण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी याप्रसंगी केले. तसेच ‘आदि कर्मयोगी अभियान’अंतर्गत राज्य व देश पातळीवरील यशाबद्दल त्यांनी प्रकल्प अधिकारी डॉ. सुनिल बारसे तसेच या अभियानात योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. कळमुनरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने हिंगोली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आज भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी प्रकल्प अधिकारी डॉ. सुनिल बारसे, सहायक प्रशासन अधिकारी आर.एस. भडके, आर. एल. भोसले, डी.यु. भानापुरे, लेखा अधिकारी कपिल पर्रे, ओ. एस. फड (सं.स.), 'उगम'चे जयाजी पाईकराव, सिरळीच्या अनुदानित आश्रमशाळेचे अध्यक्ष श्री. देशमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘आदि कर्मयोगी अभियान’मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये जे.आर. सानप, विलास राठोड, स्वाती किर्तनकार, बालाजी काळे, अरविंद सुर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिलीप महाजन यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी आदिवासी समाजातील शासकीय सेवेत नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा आणि जिल्ह्यातील 10 वी व 12 वीमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अनुदानित आश्रमशाळा सिरळी येथील 35 आदिवासी विद्यार्थिनींनी फक्त 15 मिनिटांत भागवत कथा लिहिण्याचा विक्रम केला असून त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. या सर्व 35 विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपात आपल्या भाषणातून डी. यु. भानापुरे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या विद्यार्थी, पालक, अधिकारी-कर्मचारी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे आभार मानले. **

No comments: