15 November, 2025
जिल्हास्तरीय युवा महोत्सवाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
• विजेत्या स्पर्धकांचा रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव
हिंगोली (जिमाका), दि. 15 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील कै.शिवाजीराव देशमुख सभागृहात दि. 14 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाचे उद्घाटन डॉ. विजय निलावार यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करुन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त एम. एम. राऊत, प्रा. डॉ. सुधीर वाघ, प्रा.आनंद गायकवाड, जिल्हा क्रीडा पुरस्कार्थी शिवाजी इंगोले, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, जिल्हा क्रीडा अधिकारी आर. एस. मारावार आदी उपस्थित होते.
युवक व युवतींचा राष्ट्रीय जडणघडणात महत्त्वाचा वाटा असून, युवक व युवतीने युवा महोत्सवाच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याचा नावलौकीक कमवावा, असे आवाहन डॉ. निलावार यांनी उद्घाटन प्रसंगी केले. याप्रसंगी बोलताना सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी यांनी क्रीडा व युवक संचालनालयाच्या वतीने आयोजित युवा महोत्सवामुळे युवांना आपल्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी संधी प्राप्त झाली आहे. युवक-युवतींनी कार्यक्रमाच्या माध्यमातून कलागुणांचे चांगले प्रदर्शन करावे, असे सांगून युवा महोत्सवात सहभागी युवक-युवतीला शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी युवकांचा सर्वांगीण विकास व्हावा, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांना एक खुले व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली.
जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये युवकांसाठी समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कविता लेखन, कथा लेखन व विज्ञान प्रदर्शन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील युवक व युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजयी स्पर्धकांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रेही वितरीत करण्यात आली. या महोत्सवात प्रथम आलेल्या समुहाचे, वैयक्तीक कलाकारांना बीड येथे संपन्न होणाऱ्या विभागस्तरीय युवा महोत्सवमध्ये हिंगोली जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
या जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी परीक्षक म्हणून समूह लोकनृत्य या कलाप्रकारात प्रा. राजु लोखंडे, कु. वैष्णवी लोंढे, प्रा. दिगाबंर घुगे, समूह लोकगीत या कलाप्रकारात प्रा. दिगांबर घुगे, मनिषा डहाळे, प्रथमेश कुलकर्णी, वक्तृत्व स्पर्धेत डॉ. प्रा. सुधीर वाघ, प्रा. राम तोडकर, प्रा. राजकुमार मोरगे, कथा लेखन या प्रकारात प्रा. सुरेश वराड, प्रा.राम तोडकर, प्रा. सुधीर वाघ, चित्रकला स्पर्धेमध्ये प्रा. एस. टी. तर्कसे, प्रा. अनिल गाढे, प्रा. प्रशांत चाटसे, विज्ञान व प्रदर्शन स्पर्धेमध्ये प्रा. आनंद गायकवाड, प्रा. धनजंय कुलकर्णी, प्रा. डॉ. पवन वासनिक तर कविता लेखन स्पर्धेमध्ये सर्वांनी काम पाहिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सिंधुताई दहीफळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन क्रीडाधिकारी प्रविण कोंडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा महोत्सव प्रमुख तथा क्रीडाधिकारी आत्माराम बोथीकर, क्रीडाधिकारी प्रविण कोंडेकर, क्रीडाधिकारी गणेश बोडके, युवा पुरस्कार्थी प्रविण पांडे, विजय गव्हाणे, रवी हनवते आदींनी सहकार्य केले.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment