11 November, 2021

निवृत्ती, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी बँकेशी संपर्क करावा

 

निवृत्ती, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी हयातीचा दाखला सादर

करण्यासाठी बँकेशी संपर्क करावा

       

हिंगोली (जिमाका) दि. 11:  महाराष्ट्र कोषागार नियम 1968 च्या नियम 335 नुसार निवृत्ती, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दरवर्षी दिनांक 1 नोव्हेंबर रोजीचा हयातीचा दाखला सादर करावा लागतो. हयातीचा दाखला मुख्यत: संबंधित निवृत्ती, कुटुंब निवृत्ती वेतनधारक ज्या बँकेतून निवृत्ती वेतन घेतात त्या बँकेमार्फत जिल्हा कोषागारात सादर केला जातो.

निवृत्ती, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी संबंधितांच्या बँकेशी संपर्क करावा, असे आवाहन कोषागार अधिकारी  श्री. झुंजारे यांनी केले आहे.

0000

10 November, 2021

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

 

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

हिंगोली (जिमाका), दि. 10 : जिल्ह्यात कोरोना (कोविड-19) या विषाणूचा प्रादूर्भाव, संसर्ग होत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात बंदोबस्त चालू आहे. तसेच दि. 10 व 11 नोव्हेंबर , 2021 रोजी माहेन भागवत, सरसंघचालक (आरएसएस) यांचा दौरा आहे. दि. 14 नोव्हेंबर , 2021 रोजी प्रबोधिनी स्मार्त एकादशी , दि.19 नोव्हेंबर, 2021 रोजी गुरुनानक जयंती आहे.

 तसेच नागरिकांच्या वतीने, विविध संघटना, पक्ष यांच्यातर्फे त्यांच्या मागण्यासाठी मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रकारचे प्रश्न हाताळण्यासाठी तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 10 नोव्हेंबर, 2021 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी  आदेश काढले आहेत.

            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे, अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

 

09 November, 2021

असंघटीत कामगारांना ई-श्रम कार्डाचे वाटप

 



असंघटीत कामगारांना ई-श्रम कार्डाचे वाटप

 

हिंगोली (जिमाका) दि.9: असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या राष्ट्रीय डाटा बेस तयार करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर च्या माध्यमातून ई- श्रम कार्ड तयार करणे सुरु आहे त्यानुसार आज जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते चार असंघटीत कामगारांना ई- श्रम कार्डाचे वाटप करण्यात आले. यावेळी सरकारी कामगार अधिकारी तात्याराव  कराड, सुविधाकार एन. एस. भिसे, कॉमन सर्व्हिस सेंटरचे जिल्हा समन्वयक गजानन काळे आदींची उपस्थिती होती.

कॉमन सर्व्हिस सेंटर एकूण 780 असून त्यांच्या माध्यमातून आज रोजी पर्यंत 59 हजार 880 कामगारांची नोंद केलेली असून जिल्ह्यामध्ये जे असंघटित कामगार आहेत. त्यामध्ये घरकाम करणाऱ्या महिला, रस्त्यावरील विक्रेते, दुग्धव्यवसायिक, ऑटो चालक, मॅकानिक, शिलाई मशीन कामगार, नाव्ही, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सुतार, पेंटर, बांधकाम  कामगार, इलेक्ट्रीशियन, हॉटेल चालक, ब्युटी पार्लर, वीट भट्टी कामगार, बचत गट महिला, वृत्तपत्र विक्रेते, मच्छिमार, शेत मजूर, मिल कामगार इत्यादींनी कामगारांची आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर वर जाऊन नोंद करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

000000

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयोजनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली

 


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयोजनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली

 

हिंगोली (जिमाका) दि.9: जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयोजनाच्या अनुषंगाने  जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी सभागृहात बैठक पार पडली. यावेळी अप्पर जिल्हादंडाधिकारी पांडूरंग बोरगांवकर, उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, उपविभागीय अधिकारी श्रीमती क्रांती डोंबे, सरकारी कामगार अधिकारी तात्याराव कराड, आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सर्व विभाग प्रमुखांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त 28 सप्टेंबर,2021 च्या शासन निर्णयान्वये जिल्हास्तरीय समिती गठीत करुन विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये प्रामुख्याने शासकीय पत्रव्यवहारात लोगोचा वापर प्राधान्याने करावा, जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांची नावे  मिळवून त्यांच्यावर लेख लिहावा, स्वातंत्र्य सैनिकांच्या कामगिरीवर आधारित पुस्तिका, कॉफी टेबल बुक तयार करण्यात यावे, स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकांचे जतन करावे, स्वातंत्र्य सैनिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे, त्यांचे मेळावे घेणे, यामध्ये युवकांचा सहभाग जास्तीत जास्त असावा, शिक्षण विभाग व क्रीडा विभागाने निबंध स्पर्धा, मॅरेथॉन, सायकल स्पर्धांचे आयोजन करावे, तसेच सर्व विभागांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा लोगो असलेले बॅनर छापून दर्शनी भागात चिटकावणे इत्यादी सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिल्या.

00000

माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी घेतले औंढा येथील श्री नागनाथ देवाचे दर्शन

 


माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी घेतले

औंढा येथील श्री नागनाथ देवाचे दर्शन

 

            हिंगोली (जिमाका) दि.९-  बारा ज्योतिर्लिंगापैकी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे असलेल्या आठवे ज्योतिर्लिंग श्री.नागेश्वर देवाचे राज्याच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार व माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दर्शन घेऊन नागनाथ देवाचा दुग्धाभिषेक केला. 

          यावेळी आमदार राजू नवघरे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, उपविभागीय अधिकारी डॉ.  सचिन खल्लाळ, तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले  पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांची उपस्थिती होती. यावेळी नागनाथ देवस्थानच्या वतीने राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा देवस्थानचे अध्यक्ष वैजनाथ पवार यांनी नागनाथाची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला.

000000

वसमत क्रिडा संकुलासाठी 5 कोटीचा निधी उपलब्ध करून देणार - ना. आदितीताई तटकरे

 



वसमत क्रिडा संकुलासाठी 5 कोटीचा निधी उपलब्ध करून देणार - ना. आदितीताई तटकरे

 

हिंगोली (जिमाका) दि.9: जिल्हयातील वसमत येथील तालुका क्रिडा संकुलासाठी 5 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अशी ग्वाही राज्याचे पर्यटन, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, उद्योग आणि खनीकर्म,  राज्यमंत्री ना. आदितीताई तटकरे यांनी  आज वसमत तालुक्यातील बाभुळगांव येथील आयोजित कार्यक्रमात दिली.

            वसमत तालुक्यातील बाभुळगांव येथील विविध विकासकामे व गुणवंत विद्यार्थी सत्कार, कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणार्‍या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार समारंभ तसेच नेत्र तपासणी शिबीराचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर हे होते. तर व्यासपीठावर आमदार राजुभैय्या नवघरे, दिलीप चव्हाण, महादेव एकलारे, तानाजी बेंडे, गोरख पाटील जिजा हरणे, अ. हफीज अ. रहेमान, उत्तम दगडु यांची प्रमुख उपस्थिती होती.

            यावेळी राज्यमंत्री श्रीमती तटकरे यांनी बोलतांना सांगीतले की, आमदार राजुभैय्या नवघरे यांनी गेल्या 15 वर्षांपासुन राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमामुळे सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे महत्वाचे काम होत असुन हे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. यासाठी आपल्या सर्वांचे पाठबळ व आर्शिवाद मिळाल्यामुळेच हे करणे शक्य झाले आहे. या प्रतिष्ठाणने सामान्य नागरीकांना शासनाच्या विविध योजना तसेच आरोग्य शिबीराच्या माध्यमातुन अधिक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम कौतुकास्पद असुन या माध्यमातून समाज उपयोगी व पुण्याचे काम होत असल्याचे त्यांनी नमुद केले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देवुन आपले मुळ गांव, मुळ स्थान कधीही न विसरता समाजासाठी काही तरी देणे समजुन आपण पुढाकार घेतला पाहिजे अशा शुभेच्छा दिल्या.

            तसेच कोरोना काळात अंगणवाडी सेवीका, मदतनीस, आशावर्कर यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेअंतर्गत प्रत्येक घरी भेट देवुन कुंटुंबातील सदस्यांचे आरोग्याची तपासणी केली व त्यांचा डाटा संकलीत केला.

            वसमत येथील जुने क्रिडा संकुल अपुरे पडत असल्यामुळे क्रिडा संकुलासाठी दहा ते अकरा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आलेली असुन या जागेपैकी पाच ते सहा एकर जागेमध्ये क्रिडा संकुल व उर्वरीत जागेत बिओटी तत्वावर व्यवसायिक गाळे बांधण्याचा माणस आहे. यामुळे क्रिडा संकुलासाठी चांगल्या प्रकारचे मैदान उपलब्ध होणार असुन तसेच गाळे बांधकामामुळे नागरीकांना व्यवसाय करण्यासाठी गाळे उपलब्ध होणार आहेत. यासाठी क्रिडा विभागाकडुन पाच कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच बाराशिव हनुमान तिर्थक्षेत्राचा दर्जा वाढवुन प्रादेशीक पर्यटनाच्या माध्यमातुन जादा निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

            तसेच तालुक्यातील वेगवेगळया दर्ग्यांनासुध्दा जास्तीत जास्त सुशोभीकरण व अधिकच्या मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. माझ्याकडे असलेल्या सर्व विभागाच्या माध्यमातुन निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. असे सांगितले.

            यावेळी बोलतांना आमदार नवघरे म्हणाले की, दिवाळी हा सण फक्त कुटुंबात साजरा न करता सर्व जातीधर्मातील नागरीकांसोबत साजरी करण्याची गेल्या 15 वर्षांपासुन बाभुळगांव येथे राबविण्यात येत असुन वसमत विधानसभा मतदार संघात विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबीर व शासकीय योजनाचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांना देण्यासाठी विविध शिबीरे घेण्याचा उपक्रम राबवित आहोत. या माध्यमातुन जनतेची सेवा करण्याचे काम करण्यात येत आह,असे सांगुन क्रिडा संकुलासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली.

            माजी मंत्री दांडेगांवकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, मागील अनेक दिवसामध्ये आरोग्य तपासणी शिबीरे घेवुन 30 ते 40 चाळीस हजार लोकांवर उपचार करण्यात आले. तसेच शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम या मतदार संघात होत आहे. या माध्यमातुन महाराष्ट्रात एक वेगळा व चांगला मतदार संघ तयार करण्याचे काम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

            यावेळी बाभुळगांव सर्कल मधील हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

08 November, 2021

माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम

 


माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम

 

        हिंगोली (जिमाका) दि. 8 :  राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे या हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार दिनांक 9 नोव्हेंबर,2021 रोजी सकाळी ८.३० वाजता परभणी येथून औंढा जि. हिंगोली कडे प्रयाण. 9.15 वाजता औंढा नागनाथ येथे आगमन व दर्शन, सकाळी 9.45 वाजता औंढा नागनाथ येथून वसमत कडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता वसमत येथे आगमन व जयप्रकाश  दांडेगावकर यांचे निवासस्थानी  सदिच्छा भेट.

सकाळी 10.45 वाजता वसमत येथून बाभूळगाव ता. वसमतकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता बाभूळगाव येथे आगमन व विविध विकास कामे व सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती- मतदार संघातील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर सत्कार समारंभ, शेती क्षेत्रात  व हवामान क्षेत्रातील तज्ज्ञांचा सत्कार, नेत्र तपासणी व नेत्र चिकित्सा शिबीराचे उद्घाटन, दिवाळी निमित्त फराळ वाटप कार्यक्रम, दुपारी 1.45 वाजता बाभूळगाव ता. वसमत येथून शासकीय वाहनाने औरंगाबाद कडे प्रयाण.

00000