स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयोजनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर
यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली
हिंगोली (जिमाका) दि.9: जिल्ह्यात
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयोजनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची आज जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी सभागृहात बैठक पार पडली. यावेळी
अप्पर जिल्हादंडाधिकारी पांडूरंग बोरगांवकर, उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, उपविभागीय
अधिकारी श्रीमती क्रांती डोंबे, सरकारी कामगार अधिकारी तात्याराव कराड, आदी उपस्थित
होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर
यांनी सर्व विभाग प्रमुखांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त 28 सप्टेंबर,2021
च्या शासन निर्णयान्वये जिल्हास्तरीय समिती गठीत करुन विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना
दिल्या. यामध्ये प्रामुख्याने शासकीय पत्रव्यवहारात लोगोचा वापर प्राधान्याने करावा,
जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांची नावे मिळवून
त्यांच्यावर लेख लिहावा, स्वातंत्र्य सैनिकांच्या कामगिरीवर आधारित पुस्तिका, कॉफी
टेबल बुक तयार करण्यात यावे, स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकांचे जतन करावे, स्वातंत्र्य
सैनिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे, त्यांचे मेळावे घेणे, यामध्ये युवकांचा
सहभाग जास्तीत जास्त असावा, शिक्षण विभाग व क्रीडा विभागाने निबंध स्पर्धा, मॅरेथॉन,
सायकल स्पर्धांचे आयोजन करावे, तसेच सर्व विभागांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा
लोगो असलेले बॅनर छापून दर्शनी भागात चिटकावणे इत्यादी सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी
श्री. पापळकर यांनी दिल्या.
00000
No comments:
Post a Comment