19 November, 2021

 


रेशीम शेतीचा स्वीकार करुन शेतकऱ्यांनी आर्थिक विकास साधावा

                                             -- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : पारंपारिक पिकांसोबतच एक उत्तम शेतीपूरक जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा स्वीकार करुन स्वत:चा आर्थिक विकास साधावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले .

           जिल्हा रेशीम कार्यालय, हिंगोली व एस.बी.आय. (ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था) यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली येथे 10 दिवशीय निवासी रेशीम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते. यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक धनाजी बोईले हे उपस्थित होते.  

            पारंपारिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी व त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासनस्तरावरुन वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे रेशीम शेती हा आहे. जिल्ह्यात रेशीम शेती करण्यासाठी उत्सुक असलेल्या व त्याकरिता नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसबीआय ग्रामीण स्वयंरोजगार व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा रेशीम कार्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने 10 दिवसाचे निवासी प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी यावेळी सांगितले.

            याप्रसंगी ग्रामीण स्वयंरोजगार व प्रशिक्षण संस्थेचे संचालक धनाजी बोईले यांनी जिल्हाधिकारी श्री.पापळकर यांचा सत्कार करुन प्रशिक्षण संस्थेंच्या कार्याचा आढावा मांडला.

            जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाकडून शेतकरी हितासाठी राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच त्यांनी रेशीम शेतीसाठी जिल्ह्यात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून भविष्यात हिंगोली जिल्हा हा ‘रेशीम हब’ म्हणून नावारुपास येईल, असा आशावाद व्यक्त केला.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय खिल्लारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती मुळे, कु.रुपलक्ष्मी जैस्वाल, राजेश्वर सवंडकर, तानाजी परघणे, गणेश पडघान, प्रितेश रतनालू यांनी परिश्रम घेतले.

*******

No comments: