30 November, 2021

 



कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सर्व यंत्रणानी सज्ज राहावे

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

        हिंगोली, दि.30 (जिमाका) :  कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमियोक्रॉन हा विषाणू वेगाने पसरणारा असल्याने कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आढावा बैठकीत दिल्या.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणाची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली , त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांची उपस्थिती होती.   

जिल्हाधिकारी श्री.पापळकर म्हणाले, कोरोनाचा नवा विषाणू अधिक चिंता वाढवणारा आहे. यापासून बचावासाठी सर्वांनी लस घेणे गरजेचे आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे. तसेच जिल्हा सीमेवर तपासणी पथके नेमावीत. या तपासणी पथकावर आरटीपीसीर तपासणी व कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. आठवडी बाजार व शासकीय , निमशासकीय कार्यालये येथे आरटीपीसीर तपासणी व लसीकरण शिबीरे घेऊन आरटीपीसीर तपासण्या व लसीकरण कराव्यात. यासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका कराव्यात. तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालये, खाजगी आस्थापना दुकाने, ट्रॅव्हस, खाजगी वाहने या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करावे. मास्क न वापरल्यास अशा नागरिकांवर दंडाची कारवाई करावी. यासाठी पोलीस, महसूल व नगर परिषदेचा कर्मचारी नेमून पथक तयार करावा. या पथकाने नियमितपणे कार्यवाही करुन त्याचा अहवाल सादर करावा. बाहेर देशातून आलेल्या प्रवाशांचा शोध घ्यावा. शासकीय कार्यालयातील सर्व कुटुंबियांचे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय त्यांचे वेतन अदा करु नयेत, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

यावेळी जिल्ह्याचा आढावा घेताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर यासह अन्य सुविधांची तपासणी करुन सर्व यंत्रणा सज्ज ठेवावेत, अशा सूचना केल्या. तसेच मान्यताप्राप्त खाजगी कोविड रुग्णालयाचीही सुविधा सुसज्ज ठेवण्यास सांगितले. 

या बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

*****

No comments: