शासकीय, निमशासकीय कार्यालये व बँकांमध्ये येणाऱ्या नागरिकांना
कोरोना लसीकरण बंधनकारक
- जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांचे आदेश
हिंगोली, (जिमाका) दि. 25 : शासन
व जिल्हास्तरावरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
तसेच सर्व नागरिकांनी तात्काळ कोरोना लसीकरण करुन घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या
आहेत, परंतु आजतागायत जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण झाल्याचे प्रमाण फार कमी आहे.
यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासाठी प्रतिबंधात्मक
उपाययोजना करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय
कार्यालये व बँकामध्ये येणाऱ्या नागरिकांनी कोरोना लसीकरणाचे डोस घेतले असणे
गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख, विभाग प्रमुख यांनी आपल्या
कार्यालयात, बँकेत नागरिकांनी प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे कोरोना लसीकरणाचा किमान
एक डोस पूर्ण झाले असल्याबाबत प्रमाणपत्र पाहून खात्री करण्याची कार्यवाही करावी.
तसेच ज्या नागरिकांनी कोरोना लस घेतली नाही अशांना जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन
लसीकरण करण्याबाबत सूचित करावे. लसीकरण झाल्याचे तपासणीसाठी आपल्या विभागातील
कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख,
विभाग प्रमुख यांनी आपल्या कार्यालयाच्या, बँकेच्या ठिकाणी या आदेशानुसार
लसीकरणाबाबत सूचना फलक लावण्यात यावा, असे आदेश निर्गमित केले आहेत.
या आदेशाची
अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली,
पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्ह्यातील सर्व शासकीय,
निमशासकीय कार्यालयांचे विभाग प्रमुख, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक हिंगोली, सर्व
बँकांचे व्यवस्थापक यांची असेल.
आदेशाचे पालन न
करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह हे भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक
कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील
तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहतील.
No comments:
Post a Comment