30 November, 2021

 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

 

हिंगोली, दि.30 (जिमाका) :  कोरोना विषाणूचा शासन व जिल्हास्तरावरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना म्हणून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. या प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी खालीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.

राज्य शासनाकडे गेल्या काही महिन्यांमध्ये कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद सातत्याने कमी प्रमाणात होत आहे. तसेच देशातील व शेजारच्या राज्यांतील कोविड-19 रुग्णसंख्येच्या आलेखामध्ये, निरंतर व सातत्याने घट होत आहे. आवश्यक निर्बंधांचे विविध आस्थापनांकडून कोविड-19 विषयक निर्बंधाचे पालन करण्यात येत असलेल्या शिस्तीमुळे तसेच बहुसंख्य जनतेने कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्त बाळगण्यामुळे हे सर्व यश प्राप्त झाले आहे. राज्यातील व देशातील लसीकरण मोहिमेला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे आणि त्यामुळे सार्वजनिक तसेच खाजगी आरोग्य विषयक पायाभूत सुविधांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास हातभार लागला आहे. वरील वस्तुस्थिती विचारात घेता, राज्य शासन आता आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी उठवण्याचा विचार करीत आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन अध्यक्ष, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष आपल्या अधिकारामध्ये कोविड-19 विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी निर्बंध लावण्याच्या संबंधातील राज्य शासनाच्या यापूर्वीचे सर्व आदेशांचे अधिक्रमण करुन सर्व आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व मनोरंजन विषयक क्षेत्रातील कार्यांना कोविड-19 सार्वत्रिक साथरोग येण्यापूर्वी, विविध स्थानिक किंवा इतर सक्षम प्राधिकरणानी ठरविलेल्या सर्व साधारण वेळानुसार पुढील शर्तीना अधीन राहून तात्काळ प्रभावाने खुले करण्याचे आदेश दिले आहेत.

  1. कोविड अनुरूप वर्तनाचे पालन (Covid Appropriate Behaviour) :

राज्य शासनाने व केंद्र सरकारने वेळोवेळी निर्धारित केलेल्या कोविड अनुरुप वर्तनाचे (CAB), सेवा प्रदाते, परीवास्तूंचे (जागांचे) मालक, परवानाधारक, आयोजक, इत्यादींसह सर्वांनी तसेच सर्व अभ्यागत, सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी, इत्यादींनी काटेकोर पालन केले पाहिजे. कोविड अनुरुप वर्तनाची तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे तसेच त्याचे उल्लंघन केल्यास करावयाचे दंड, जबाबदारी, कोविड अनुरुप वर्तनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि यात यापुढे नमूद केलेल्या दंडानुसार असेल.

2.    संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता:

अ.    तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या, कोणत्याही कार्यक्रमाच्या, समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणाऱ्या व्यक्ती (जसे की, खेळाडू, अभिनेते, इत्यादी), अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांचे, यात यापुढे दिलेल्या व्याख्येनुसार, संपूर्ण लसीकरण केलेले असावे. याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी न.प.-न.पं., गटविकास अधिकारी, पोलीस विभागावर असणार आहे.

आ.  जेथे जनतेतील कोणत्याही व्यक्तींना येण्याचा आणि सेवा घेण्याचा हक्क आहे असे कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन (मेळावे), इत्यादी ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे. याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी न.प.-न.पं., गटविकास अधिकारी, पोलीस विभागावर असणार आहे.

इ.       सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल. याची जबाबदारी परिवहन महामंडळ अधिकारी, पोलीस विभागावर असणार आहे.

ई.       राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास (https://epassmsdma.mahait.org किंवा telegram-MahaGovUniversalPass Bot) हा संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल. अन्यथा, छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले कोविन प्रमाणपत्र देखील त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी, इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणांमुळे ज्या व्यक्ती, लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय व्यावसायीका कडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल. याची जबाबदारी उप्रपादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस विभाग, आरोग्य विभाग व इतर संबंधित अधिकारी यांची असेल.

उ.      जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी त्या खुल्या असण्याची शर्त नसली तरी, त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे. याची जबाबदारी उप्रपादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस विभाग, इतर संबंधित अधिकारी यांची असेल.

3.    महाराष्ट्र राज्यात प्रवास :

ऊ.    कोणत्याही आंतरराष्ट्रीय गतव्यवस्थापनावरुन राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांचे या बाबतीतील भारत सरकारच्या निर्देशांद्वारे विनियमन करण्यात येईल. राज्यात येणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे, एकतर यात यापुढे व्याख्या केल्यानुसार संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा 72 तासांसाठी वैध असलेले आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र ते बाळगतील. याची जबाबदारी उप्रपादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस विभाग, इतर संबंधित अधिकारी यांची असेल.

4.   कोणताही कार्यक्रम, समारंभ, इत्यादींमधील उपस्थितीवरील निर्बंध :

अ.    चित्रपट गृह, नाट्यगृह, मंगल कार्यालय, सभागृह, इत्यादी बंदिस्त / बंद जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या / समारंभाच्या / उपक्रमाच्या बाबतीत जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना परवानगी दिली जाईल.

आ.  संपूर्ण खुल्या असलेल्या (open to sky) जागांच्या बाबतीत कोणत्याही समारंभासाठी किंवा संमेलनांसाठी तेथील जागेच्या 25 टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता, औपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल तर (स्टेडीयम प्रमाणे), संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास अशी क्षमता ठरवण्याचा अधिकार असेल.

ऋ.    जर वरील नियमांनुसार कोणत्याही संमेलनासाठी (मेळाव्यासाठी) उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या एक हजारांपेक्षा अधिक असेल तर, अशा बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागेल आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अशा कोणत्याही संमेलनाचे (मेळाव्याचे) निरीक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठवील आणि तेथे वर नमूद केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन केले जात असल्याची खात्री  करतील. कोविड-19 च्या प्रसाराचा धोका लक्षात घेता, तेथे कोविड अनुरुप वर्तनाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले तर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या उक्त प्रतिनिधीला, कार्यक्रम पूर्णतः किंवा अंशतः बंद करण्याचे आदेश देण्याचा प्राधिकार असेल. याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी न.प.-न.पं., पोलीस विभाग, इतर संबंधित अधिकारी यांची असेल.

5.      संपूर्ण लसीकरणाची व्याख्या :

संपूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती याचा अर्थ लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतलेल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर 14 दिवस झालेले आहेत अशी कोणतीही व्यक्ती, असा आहे; किंवा ज्या व्यक्तीची वैद्यकीय स्थिती अशी आहे की, ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्ती, असा आहे; किंवा 18 वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती, असा आहे.

6.    कोविड अनुरुप वर्तनविषयक नियम व दंड :-

व्याख्या : कोविड-19 विषाणूचा प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यामुळे त्याच्या प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व संस्थेने पालन करण्याची गरज असलेले दैनंदिन सामान्य वर्तन अशी कोविड अनुरुप वर्तन (CAB) या संज्ञेची व्याख्या करता येऊ शकेल. ज्यांचे कोविड अनुरूप वर्तन (CAB) म्हणून वर्णन केले जाते अशा वर्तनाच्या पैलूंमध्ये, खाली नमूद केलेल्या वर्तनांचा समावेश होतो आणि कोविड-19 विषाणूचा प्रसार होण्यास जे अडथळा निर्माण करु शकतील अशा सर्व तर्कसंगत पैलूंचा देखील समावेश होतो, त्यात नमूद केलेली त्याच्या प्रसाराची कार्यपद्धती (methodology) दिलेली आहे.

        मूलभूत कोविड अनुरुप वर्तनाचे काही पैलू पुढीलप्रमाणे असून त्यांचे प्रत्येकाने सदैव पालन केले पाहिजे. सर्व संस्थांनी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की, त्यांचे सर्व कर्मचारी, त्यांच्या परिसरात भेट देणारे अभ्यागत, ग्राहक किंवा संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी होणारी कोणतीही व्यक्ती त्याचे पालन करतील आणि त्यांच्या परिसरांमध्ये आणि / किंवा व्यवसायाशी संबंधित व्यवहार करताना किंवा संबंधित संस्थेशी संबंधित असलेली अन्य कार्य करताना, त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता संस्था उत्तरदायी असतील. संस्था, त्यांच्या नियंत्रणाखाली किंवा जेथे ती संस्था आपला व्यवहार किंवा इतर कार्ये करत असेल अशा सर्व ठिकाणी, अशा सर्व कर्मचाऱ्यांनी कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या हँड सॅनिटायझर, साबण व पाणी, तापमापक (thermal scanner) इत्यादी गोष्टी उपलब्ध करण्यासाठी देखील जबाबदार आहेत.

1.       नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे. (रुमालाला, मास्क समजले जाणार नाही आणि रुमाल वापरणारी व्यक्ती दंडास पात्र असेल.)

2.      जेथे जेथे शक्य असेल तेथे नेहमी सामाजिक अंतर (6 फुट अंतर) राखा.

3.      साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात स्वच्छ धुवा.

4.     साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता, नाक/डोळे/तोंड यांना स्पर्श करणे टाळा.

5.      योग्य श्वसन स्वच्छता (आरोग्य) राखा.

6.      हात नियमितपणे आणि वारंवार स्वच्छ व निर्जंतूक करा.

7.     खोकताना किंवा शिंकताना टिश्यू पेपरचा वापर करुन तोंड व नाक झाका आणि वापरलेले टिश्यू पेपर नष्ट करा; जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल तर, त्याने स्वतः चा हात नव्हे तर, हाताचा वाकवलेला कोपर नाका तोंडावर ठेवून खोकावे व शिंकावे.

8.      सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.

9.      सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर (6 फुट अंतर) राखा.

10.   कोणालाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार / अभिवादन करा.

11.   कोविड -19 विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक असलेले अन्य कोणतेही तर्कसंगत वर्तन.

शास्ती :

·         या नियमांनुसार अपेक्षित असलेल्या कोविड अनुरुप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी 500 रुपये इतका दंड करण्यात येईल. याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी न.प.-न.पं., पोलीस विभाग, सर्व कार्यालय प्रमुख यांची असेल.

·         ज्यांनी, आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादींवर कोविड अनुरूप वर्तन लादणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही परीवास्तूत (जागेत), जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतिरिक्त, अशा संस्थांना किंवा आस्थापनांना सुद्धा 10 हजार रुपये इतका दंड करण्यात येईल. जर कोणतीही संस्था किंवा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक इत्यादींमध्ये कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी न.प.-न.पं., पोलीस विभाग, सर्व संबंधित अधिकारी यांची असेल.

·         जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने, स्वतःच कोविड अनुरुप वर्तनाचे (CAB) किंवा प्रमाण कार्यचालन कार्यपध्दतीचे (SOP) पालन करण्यात कसूर केली तर, ती, प्रत्येक प्रसंगी, 50 हजार रुपये इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी न.प.-न.पं., पोलीस विभाग, सर्व संबंधित अधिकारी यांची असेल.

·         जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये कोविड अनुरुप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर कोविड अनुरुप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना 500 रुपये इतका दंड करण्यात येईल, तसेच सेवा पुरविणारे वाहनचालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील 500 रुपये इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीज कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी 10 हजार रुपये इतका दंड करण्यात येईल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल. याची जबाबदारी वाहतूक पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सर्व संबंधित अधिकारी यांची असेल.

·         कोविड अनुरुप वर्तणूकीसंबंधीच्या वर नमूद केलेल्या नियमांचे अनिवार्यपणे पालन करण्यात येईल आणि त्यांचे उल्लंघन केल्यास वर नमूद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल. तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे उल्लंघन करणाऱ्यांवर इतर कोणताही दंड किंवा शास्ती लादता येईल. कोविड अनुरूप वर्तनाचे नियम / धोरणे वरील प्रमाणे असतील आणि त्यामध्ये विशेषरित्या नमूद न केलेले कोविड अनुरूप वर्तनाशी संबंधित असणारे इतर कोणतेही विषय / मुद्दे, राज्य शासनाच्या अंमलात असलेल्या प्रचलित नियमांनुसार / आदेशांनुसार असतील.  

या आदेशातील सूचनांचे नागरिकांनी / संबंधितांनी तंतोतत पालन करावे. आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था, आस्थापना अथवा समूह हे भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार तसेच या आदेशात नमूद केलेल्या शिक्षेस पात्र राहतील. आदेशाची अंमलबजावणी  करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हिंगोली, सर्व मुख्याधिकारी न.प.-न.पं, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अधिकारी व जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी यांची असेल. तसेच जबाबदारी निश्चित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी या आदेशानुसार केलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल (E-mail- rdc.hingoli123@gmail.com) यावर पाठविण्यात यावा, असे आदेश देण्यात आलेले आहेत.

*****

No comments: