मंदिरे, प्रार्थनास्थळे, धार्मिक स्थळात प्रवेश करण्यासाठी
लसीकरण बंधनकारक
- जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांचे आदेश
हिंगोली, (जिमाका) दि. 25 : शासन
व जिल्हास्तरावरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
तसेच सर्व नागरिकांनी तात्काळ कोरोना लसीकरण करुन घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या
आहेत, परंतु आजतागायत जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण झाल्याचे प्रमाण फार कमी आहे.
यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासाठी प्रतिबंधात्मक
उपाययोजना करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सर्व मंदिरे,
प्रार्थनास्थळे, धार्मिक स्थळात प्रवेश करण्यापूर्वी नागरिकांचे कोरोना लसीकरण
झाले असणे गरजेचे आहे. यासाठी सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे, धार्मिक स्थळात प्रवेश
करण्यापूर्वी आलेल्या नागरिकांचे कोरोना लसीकरणाचे किमान एक डोस झाला असल्याबाबतचे
प्रमाणपत्र धार्मिक, प्रार्थना स्थळाशी संबंधित व्यक्तींनी, मंडळांनी तपासून
घ्यावे व ज्या नागरिकांनी कोरोना लस घेतली नसेल अशा नागरिकांना जवळच्या लसीकरण
केंद्रात जाऊन लस घेण्याबाबत सूचित करण्यात यावे. तसेच धार्मिक, प्रार्थना स्थळाशी
संबंधित व्यक्तींनी, मंडळांनी प्रार्थना स्थळाच्या आवारात, बाहेर या आदेशानुसार
लसीकरणाबाबत सूचना फलक लावण्यात यावा, असे आदेश निर्गमित केले आहेत.
या आदेशाची
अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली,
पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गट विकास
अधिकारी, सर्व मुख्याधिकारी न.प.-न.पं., सर्व संबंधित शासकीय अधिकारी, कर्मचारी,
सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे, धार्मिकस्थळे येथील प्रमुखांची असेल. आदेशाचे पालन न
करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह हे भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक
कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील
तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहतील.
*******
No comments:
Post a Comment