22 March, 2017

जलसाक्षरता आणि जलव्यवस्थापन काळाची गरज
                                      जिल्हाधिकारी अनिल भंडारी
        हिंगोली,दि.22: पाण्याचे दैनंदिन जीवनात वापर करतांना प्रत्येक नागरिकाने काटकसरीने वापर करण्याची आवश्यकता आहे. मागील कालावधीतील दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा विचार करता जलसाक्षरता आणि जलव्यवस्थापन ही काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.
              जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.डी.सी. सभागृहात जलजागृती सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळ नांदेडचे अधिक्षक अभियंता श्री. तांदळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. लोखंडे, कार्यकारी अभियंता एस. एम शेख जलसंपदा विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता बी.आर. देशमुख, कार्यकारी अभियंता श्री. पडलवार यांची उपस्थिती होती.
            पुढे जिल्हाधिकारी भंडारी म्हणाले की, कृषी आणि औद्योगिक क्षेत्रासह घरगुती वापराकरीता सर्वात जास्त पाण्याचा वापर होतो.  त्याकरीता शासनाच्या जलव्यवस्थापनाबाबत नागरिकांबरोबरच युवा पिढींना प्रोत्साहित करुन पाण्याचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. पाणी टंचाईचा प्रश्न हा जनतेचा सक्रिय सहभाग व सहकार्य मिळाल्याशिवाय संपणार नाही. पाण्याची उपलब्धता व पाणी वापराचे नियोजन, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचा गरजेपुरता वापर करणे, पाण्यासंबंधी कायदे व नियमांचे पालन जलव्यवस्थापनाबाबत समाज जागृती व साक्षरता निर्माण होण्यासाठी जागतिक जल दिनाचे औचित्य साधून गतीवर्षीपासून 16 ते 22 मार्च हा सप्ताह जल जागृती सप्ताह म्हणून सर्वत्र राबविण्यात येत आहे.  या जल जागृती सप्ताहमुळे काय फरक पडला याचा विचार करणे ही आवश्यक आहे.
            जलयुक्त शिवार अभियानातंर्गत जिल्ह्यात जलसंधारणाची विविध कामे प्रगतीपथावर आहेत. आपल्याकडे पडणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी नुसन, आपण पडणाऱ्या पावसाच्या केवळ 42 टक्के पाण्याचा वापर करतो.  
राज्य शासनाने नरेगातंर्गत जिल्ह्याला 10 हजार विहिरी मंजूर केल्या आहेत. भूसंपादन कायद्यामुळे जिल्ह्यात मोठे प्रकल्प सुरु करण्यासाठी अडचण निर्माण होत आहेत. परंतू यासठी महसूल, जलसंपदा आणि कृषि विभागानी शेतकऱ्यांना सदर भूसंपादन कायद्याची सविस्तर माहिती द्यावी असे हि जिल्हाधिकारी भंडारी यावेळी म्हणाले.
            अधिक्षक अभियंता श्री. तांदळे म्हणाले की, 22 मार्च 1992 पासून जागतीक जल दिन साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने गतवर्षीपासून राज्यात 16 ते  22 मार्च हा सप्ताह जल जागृती सप्ताह म्हणून राबविण्यात येत आहे. कालव्याद्वारे आणि बाष्पीभवनाद्वारे होणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आता पाणी टंचाईचा विचार करुन राज्य शासनाने सिंचनासाठी पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी टंचाई लक्षात घेवून प्रत्येकाने जलव्यवस्थापन करुन पाणी वापरावे. तसेच पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचे जलपुर्नभरण करावे.
            यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. लोखंडे, बी.आर. देशमुख, उप  कार्यकारी अभियंता प्रियंका झोरे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
            प्रारंभी जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधु, पैनगंगा आणि पुर्णा नदीतील जलकलशाचे मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. तसेच जलजागृती दिनाचे औचित्य साधुन वृक्षारोपण ही करण्यात आले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता श्री. एस. एम शेख यांनी केले. तसेच श्री. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डी. डी. कुलकर्णी यांनी केले तर कार्यकारी अभियंता श्री. पडलवार यांनी आभर मानले.

****








No comments: