विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य ओळखुनच रोजगार क्षेत्राची निवड करावी
-- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
हिंगोली, दि.7: समृद्ध जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे
महत्त्वाचे साधन म्हणजे कौशल्य आणि रोजगार होय. त्याकरीता विद्यार्थ्यांनी
आपल्यातील कौशल्य ओळखुनच रोजगार क्षेत्राची निवड करावी जेणेकरुन आपणांस जीवनात यश
आणि समाधान मिळेल असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आज येथे केले.
नगर परिषद, हिंगोली च्या कल्याण मंडपम्
येथे दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानातंर्गत नगर परिषद, हिंगोली
व जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्या संयुक्त
विद्यमाने जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने
आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी हिंगोली शहराचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर,
उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, नगरसेवक अनिता सुर्यतळ, रोजगार विभागाच्या सहाय्यक संचालक
रेणुका तम्मलवार आणि नगर पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री. भंडारी म्हणाले की,
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही सुप्त कलागुण आणि कौशल्य असते केवळ त्यांची जाणीव होणे आवश्यक आहे. आपल्यातील कौशल्य आणि
गुणानुसार आपणांस विविध व्यवसाय-उद्योगात काम करण्याची संधी आपणांस मिळावी,
प्रेरणा मिळावी, या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. शासनाच्या
विविध विभागामार्फत रोजगार आणि व्यवसायाच्या संधी आज उपलब्ध आहे. तसेच
युवक-युवतींना स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी शासनाने ‘मुद्रा योजना’
सुरु केली आहे. या योजनेतंर्गत लाभार्थ्यास शिशु, किशोर आणि तरुण गटनिहाय बँक कर्ज
उपलब्ध करुन देणार आहे. तरुणांची स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरु करण्याची इच्छा
असल्यास जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी मदत करेल.
केंद्र सरकार व महाराष्ट्र
शासनामार्फत मॉड्युलर एम्पलॉयमेंट स्कीम, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रमोद
महाजन कौशल्य विकास योजना, स्कील मॅपिंग, करिअर गाइडन्स कौन्सिलिंग सेंटर तसेच
रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यांचेही प्रभावीपणे आयोजन करण्यात येत असून
युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ही जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी
यावेळी केले.
नगराध्यक्ष
श्री. बांगर यावेळी म्हणाले की, रोजगार मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित असलेले विद्यार्थी विद्यार्थिनींचे रोजगार
मेळाव्यातील उपस्थितीचे लक्षणीय प्रमाण स्वागतार्ह आहे. रोजगार मेळाव्याद्वारे विद्यार्थ्यांना नोकरी
मिळविताना येणाऱ्या अडचणींना सामोरे जातांना फारसा त्रास होत नाही. विद्यार्थ्यांनी या
संधीचा लाभ घेवून आपले करीअर घडवावे.
नगर पालिकेचे
मुख्याधिकारी रामदास पाटील प्रास्ताविकात म्हणाले की, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय
नागरी उपजिवीका अभियानातंर्गत नगर परिषद, हिंगोली व जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बेरोजगार
युवक-युवतींना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात
आलेले आहे. नगर पालिकेला एकुण 840 विद्यार्थ्यांना
प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 103 विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले
असून, 90 विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरु असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.
यावेळी
रोजगार विभागाच्या सहाय्यक संचालक रेणुका तम्मलवार,
नपाचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, नगरसेवक अनिता सुर्यतळ, यांनी रोजगार मेळाव्यास उपस्थित
विद्यार्थी-विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या रोजगार मेळाव्यात
हैद्राबाद येथील जी. फोर. एस, आयसीआयसीआय, मुंबई, नवभारत फर्टीलायझर, नांदेड आणि राज
बियाणी, नांदेड या आस्थापनानी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.
यावेळी रोजगार
मेळाव्यास मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन डॉ. निलावार यांनी केले तर नपाचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी आभार
व्यक्त केले.
स्वच्छ भारत अभियानात
सहभागी महिला बचत गटांचा सत्कार
स्वच्छ भारत अभियानातंर्गत
सक्रीय सहभाग नोंदवून काम करणाऱ्या पार्वती महिला बचत गट, महामाया महिला बचत गट, देविका
महिला बचत गट, गोमती महिला बचत गट आणि शिवमहिमा महिला बचत गटांचा मान्यवरांच्या हस्ते
प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
ऑनलाईन टॅक्स भरण्यासाठी
नगर परिषदेला 15 पॉस मशीन उपलब्ध
हिंगोली नगर पालिकेत
अत्याधुनिक कार्यप्रणालीद्वारे ऑनलाईन टॅक्स भरण्याची सुविधा निर्माण झाली आहे. या
सेवेने नागरिकांना कर भरणे सुलभ होणार आहे. या ऑनलाईन टॅक्स भरणा सुविधेचे जिल्हाधिकारी
अनिल भंडारी यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला.
ऑनलाईन टॅक्स
भरण्याची सुविधेमुळे टॅक्स भरणा प्रक्रिया
कमीत कमी वेळेत पार पाडता येणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण
करता येणार असल्याचे मुख्याधिकारी रामदास पाटील म्हणाले. या ऑनलाईन टॅक्स भरण्याची सुविधेकरीता एचडीएफसी
बँकेने 15 पॉस मशीन हिंगोली नगर पालिकेला उपलब्ध करुन दिले आहेत.
*****
No comments:
Post a Comment