·
हिंगोली व परभणी जिल्ह्यातील
पिकांचे तातडीने पंचनामे करावीत.
·
अहिल्याबाई होळकर यांच्या नावे
प्रायोगिक तत्वावर पाचशे रोपवाटिका तयार करणार.
·
रानभाज्या विक्री महोत्सव
सातत्याने सुरु ठेवावीत.
हिंगोली/परभणी,दि.27 : कोरोना महामारीच्या काळात प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी
मार्गक्रमण करीत असतांना स्वत:चे दु:ख बाजूला सारुन राज्यातील सर्व जनतेस कोणत्याही प्रकारचे
अन्नधान्य आणि दूधाची कमी पडू दिले नाही, याचे श्रेय सर्व शेतकरी बांधवांना द्यावे
लागेल. यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून समाजानेही शेतकरी
बांधवांना मानसिक आधार देवून त्यांना साथ देण्याचे आवाहन कृषि मंत्री दादाजी भूसे
यांनी केले.
येथील
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डीपीसी सभागृहात हिंगोली व परभणी जिल्ह्यातील पाऊस,
पीक परिस्थिती आणि कृषी योजना अंमलबजावणीबाबतच्या आढावा बैठकीत कृषी मंत्री दादाजी
भुसे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, खासदार हेमंत पाटील,
आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक
राकेश कलासागर, कृषी सहससंचालक तुकाराम जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी अरुण संगेवार
हिंगोलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, परभणीचे जिल्हा अधीक्षक कृषी
अधिकारी संतोष आळसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृषि
मंत्री श्री. भुसे पुढे म्हणाले की, सध्या हिंगोली व परभणी जिल्ह्यात दररोजच कमी
अधिक प्रमाणात पाऊस पडत असुन ढगाळ वातावरणामुळे पिके पिवळी पडत आहे. अतिवृष्टीमुळे
ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले तेथील पिकांचे जलदगतीने पंचनामे करावेत. यासाठी
आवश्यकता भासल्यास ग्रामविकास व महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी नियुक्त करुन या
सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत. महाराष्ट्रात
सगळीकडेच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीची माहिती एकत्रित
करुन मंत्रीमंडळ बैठकीत ठेवून शेतकरी बांधवाच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्यात
येणार आहे. तसेच केंद्राकडे देखील याबाबत मदत करण्यासाठी विनंती करण्यात येणार
असून त्यासाठी केंद्रीय पथकास पाहणी दौऱ्याची विनंती करण्यात येणार असल्याचे असल्याचेही
श्री. भुसे यावेळी म्हणाले.
प्रधानमंत्री
किसान योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची संयुक्त पथक नेमून माहिती घ्यावी
आणि निकषात पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची नोंद करावी. जिल्ह्यातील धरणामध्ये पुरेसा जलसाठा
झालेला असून त्यामूळे रब्बी क्षेत्रात वाढ होणार आहे. यासाठी बियाणे व खतांची विशेषत:
युरिया खताची कमतरता पडणार नाही याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी श्री.
भूसे यांनी पिक विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींशी भ्रमणध्वणीवर संपर्क साधुन प्रत्येक
तालुका आणि क्षेत्रीय पातळीवर संपर्क साधण्याच्या पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना
सूचना द्याव्यात, असे निर्देश दिले. तसेच क्षेत्रनिहाय विमा प्रतिनिधींची माहिती
घेवून त्यांचे संपर्क क्रमांकांची यादी प्रसिध्दी करावी. तसेच या कंपन्याकडे कृषि
विभागाने व शेतकऱ्यांनी सद्यस्थितीतील नुकसानीची माहिती कळवावी अशाही सूचना कृषि
मंत्री भुसे यांनी यावेळी केल्या.
खरिप पेरणीच्या
सुरुवातीस सोयाबीन बियाणांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या. या
बियाणांची पडताळणी करुन अनेक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर काही
कंपन्याचे परवाने रद्द करण्यात आले. त्यामूळे पुढील पेरणीकरीता शेतकऱ्यांनी
स्वत:चे बियाणे तयार करण्यासाठी चांगल्या प्रकारचे बियाणे काढून ठेवावे. कृषि
विभागाने ही मोहीम चांगल्या प्रकारे राबविल्यामूळे बियाणे कमी पडले नाही. माननीय
मुख्यमंत्री यांनी ‘विकेल ते पिकेल’ ही योजना सुरु केली असून ग्राहकांची जी मागणी आहे,
त्याच पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे,
असा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईल.
कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर रानभाज्या महोत्सवाला महत्व आले आहे. पूर्वजांनी जपलेला हा
निसर्गाचा ठेवा नागरिकांसमोर यावा व त्याद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा हाच
उद्देश समोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला.
हा उपक्रम एक दिवसाचा न राहता कायमपणे कसा राहील यासाठी प्रयत्न करण्याची
गरज असुन ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महापालिकेने यासाठी जागा उपलब्ध करुन
द्याव्यात. यामुळे ग्राहकांना ताजा भाजीपाला व फळे उपलब्ध होवून त्याचा फायदा थेट
शेतकऱ्यांना होणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने प्रायोगिक तत्वांवर 500
रोपवाटीका तयार करण्याचे काम सुरु असून, या रोपवाटीकेमध्ये भाजीपाल्यांची रोपे
तयार करण्यात येणार आहेत. याचा जास्तीत-जास्त लाभ मराठवाडा आणि विदर्भाला देण्याचा
मानस असल्याचेही यावेळी कृषि मंत्री श्री भुसे यांनी सांगितले.
हिंगोली
जिल्ह्यात पिक कर्ज वाटपाचे प्रमाण अत्यल्प झाले असून जे शेतकरी बांधव बँककडे
कर्जाची मागणी करण्यासाठी जात आहे त्यांना बँक कर्मचाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक
दिली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असुन हे बरोबर नाही. शेतकऱ्यांना
सौजन्याची वागणुक देण्याबाबत सर्व बँकांना जिल्हाधिकारी यांनी सुचना करावी आणि पिक
कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजनेच्या
माध्यमातून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्याचे काम सुरु आहे. यासाठी गोडाऊन, शितगृहे,
वाहतूक, प्रक्रीया उद्योग आदीबाबत नियोजन करुन शेतकरी उद्योजक निर्मित उत्पादन
करण्यात येणार असल्याचे सांगत नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेंतर्गत प्रलंबित प्रकरणी
तातडीने कार्यवाही करावी.
हिंगोली
जिल्ह्यात हळदीचे शास्त्रीय पध्दतीने संशोधन करण्यासाठी प्रक्रीया केंद्र
उभारण्याचे काम शासनाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. यासाठी खासदार हेमंत पाटील
यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून खासदार पाटील यांनी हिंगोली व
परभणीकडेच न पाहता संपूर्ण महाराष्ट्रात उत्पादन घेणाऱ्या हळद उत्पादक शेतकऱ्यांना
कसा न्याय देता येईल यासाठी प्रयत्न करावेत, असेही कृषी मंत्री भुसे यावेळी खा.
पाटील यांना म्हणाले.
यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे
सरसकट पिकाचे पंचनामे करण्याची मागणी केली. तसेच पिक कर्ज वितरणाचे प्रमाण खूप कमी
झाल्याची खंत व्यक्त करुन शेतकऱ्यांप्रती बँकांची वागणूक अशोभनीय आहे. याबाबत
जिल्हाधिकाऱ्यांनी दरमहिन्यास आढावा बैठक घेवून उद्दिष्ट पूर्ण करण्यास सांगावे.
ज्या बँका उद्दिष्ट पूर्ण करत नाहीत त्यांचा अहवाल रिझर्व्ह बँकेस कळविण्याच्या सूचना
देवून पिक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली.
यावेळी आमदार
राजु नवघरे यांनी हिंगोली जिल्हा हा मागास जिल्हा असून यावर्षी जिल्ह्यात मोठ्या
प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सोयाबीन कापूस उस पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे
पंचनामे करुन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची तसेच
हिंगोली जिल्ह्यातील सर्व गावे नानाजी देशमुख कृषि संजिवनी योजनेत घेण्याची विनंती
केली. आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी सततच्या पावसामुळे मुग, उडीद सोयाबीन हातचे
गेल्यामूळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली. तसेच हिंगोली जिल्ह्यात ओला
दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार संतोष बांगर यांनी केली.
हिंगोलीचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय लोखंडे यांनी जिल्ह्यातील पाऊस, पीक
परिस्थिती तसेच ‘विकेल ते पिकेल’, पोकरा यासह इतर कृषी योजनांच्या जिल्ह्यातील
अमंलबजावणी बाबत माहिती दिली. यामध्ये माहे जून ते ऑगस्ट मध्येअतिवृष्टीमुळे
शेतीपिकांच्या नुकसानीचे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले असून 06 हजार 119 हेक्टर बाधीत
क्षेत्र आहे. जिल्ह्यात सन 2020-21 खरीप हंगामामध्ये एकूण प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र
04 लाख 6 हजार 773 हेक्टर इतके आहे. तसेच राष्ट्रीय बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, ग्रामीण बँकांनी
मिळून दि. 26 सप्टेंबर अखेर खरीप कर्ज एकूण रु. 485 कोटी 80 लक्ष वाटप केले आहे.
महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 86 हजार 653 शेतकऱ्यांना 565
कोटी 58 लक्ष रु. कर्ज वाटप करण्यात आले आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी
प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील एकूण 240 गावाची निवड करण्यात आली असून त्यांना 16
कोटी 95 लक्ष रु. एवढे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. विकेल ते पिकेल धोरणातंर्गत
उपप्रकल्पांच्या अर्थसहाय्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन
प्रकल्प (SMART), नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (POCRA), केंद्र पुरस्कृत
शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्याची योजना (FPO), राज्य पुरस्कृत गट शेती
योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास इत्यादी योजनातून अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.
पंतप्रधान पिक विमा योजना खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील 3 लाख 888
अर्ज आले असून त्यामधून 1 लाख 47 हजार 723 हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये समाज माध्यमांचा वापर करुन
शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करण्यासाठी शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उप्तादक कंपनी
व ग्राहक यांच्या व्हॉटस् ॲप ग्रुप तयार करुन भाजीपाला व फळांची थेट ग्राहकांना
विक्री करण्यात आली. यामध्ये एकूण 57 गटांद्वारे व 135 व्हॉट्स अप ग्रुपद्वारे 07
हजार 653 क्विंटल भाजीपाला व फळांची विक्री करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी
अधीक्षक अधिकारी विजय लोखंडे यांनी सादरीकरणांद्वारे दिली.
परभणीचे जिल्हा
कृषी अधीक्षक अधिकारी संतोष आळसे यांनी जिल्ह्यातील पाऊस, पीक परिस्थिती तसेच
विकेल ते पिकेल, पोकरा यासह इतर कृषी योजनांच्या जिल्ह्यातील अमंलबजावणीबाबत
माहिती दिली. यामध्ये माहे जून ते ऑगस्ट मध्येअतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या
नुकसानीचे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले असून 27 हजार 412 हेक्टर बाधीत
क्षेत्र आहे. जिल्ह्यात सन 2020-21 खरीप हंगामामध्ये एकूण प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र
05 लाख 23 हजार 809 हेक्टर इतके आहे. तसेच राष्ट्रीय बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, ग्रामीण बँकांनी
मिळून दि. 26 सप्टेंबर 2020 अखेर खरीप कर्ज एकूण रु. 710 कोटी 83 लक्ष वाटप केले
आहे. महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 01 लाख 71 हजार 166
शेतकऱ्यांना 1069 कोटी रु. कर्ज वाटप करण्यात आले आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी
प्रकल्पातंर्गत जिल्ह्यातील एकूण 275 गावाची निवड करण्यात आली असून 4 हजार 954
शेतकरी लाभार्थ्यांना 12 कोटी 79 लक्ष रुपये एवढे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
विकेल ते पिकेल धोरणातंर्गत उपप्रकल्पांच्या अर्थसहाय्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषि
व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART), नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प
(POCRA), केंद्र पुरस्कृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्याची योजना
(FPO), राज्य पुरस्कृत गट शेती योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास, भाऊसाहेब
पांडुरंग फळबाग लागवड योजना, महात्मा गांधी राष्टीय ग्रामीण रोजगार हमी
योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजना इत्यादी योजनातून अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.
पंतप्रधान पिक विमा योजना खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील 07 लाख 129अर्ज
आले असून त्यामधून 3 लाख 76 हजार 81 हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये समाज माध्यमांचा वापर करुन
शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करण्यासाठी शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उप्तादक कंपनी
व ग्राहक यांच्या व्हॉटस् ॲप ग्रुप तयार करुन भाजीपाला व फळांची थेट ग्राहकांना
विक्री करण्यात आज्याचह माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी संतोष आळसे यांनी
सादरीकरणाद्वारे दिली.
यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपविभागीय कृषि अधिकारी,
तालूका कृषि अधिकारी यांची उपस्थिती होती.
बैठकीनंतर कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी औंढा तालुक्यातील हिवरा
जाटू येथील ग्यानदेव उघडे यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन
पिकांची पाहणी केली. तर काठोडा तांडा येथील शेतकरी विठ्ठल बुचके यांच्या शेतातील
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. औंढा नागनाथ येथील श्रीभोणे या
शेतकऱ्यांच्या भाजीपाला व फळाच्या स्टॉलचे उद्घाटन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी
केले.
****