26 September, 2020

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ही मोहिम आरोग्याची चळवळ व्हावी ---- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

 


औरंगाबाद. (विमाका) दि. 26 ---  कोरोनावर मात करण्यासाठी  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारीही मोहिम प्रभावीपणे राबवावी. या मोहिमेत प्रत्येकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.  ही मोहिम आरोग्याची  चळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.  ज्याप्रमाणे केरळ हे देशातील सर्वाधिक साक्षरतेचे राज्य म्हणून ओळखले जाते. त्याप्रमाणे आपला महाराष्ट्र हे आरोग्य साक्षरतेत सर्वात पुढे राहील, असे प्रयत्न करायचे आहेत. स्वतःची काळजी घेतानाच इतरांची कशी काळजी घ्यायची. गर्दीच्या ठिकाणी कसे वर्तन करायचे या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहचवायच्या आहेत, असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज मराठवाडा विभागातील आठ जिल्हयांशी दृकश्राव्य प्रणालीव्दारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी   उदयोग मंत्री  तथा औरंगाबाद जिल्हयाचे पालकमंत्री  सुभाष देसाई. सार्वजनिक बांधकाम मंत्री  तथा नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री  अशोक चव्हाण, अल्पसंख्याक विकास  व औकाफ मंत्री तथा परभणी जिल्हयाचे पालकमंत्री नवाब मलिक, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण  मंत्री  तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री  राजेश टोपे,  वैदयकीय शिक्षण मंत्री  तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री  अमित देशमुख, सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री  तथा बीड जिल्हयाचे पालकमंत्री  धनंजय  मुंढे सहभागी झाले होते.

      तर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक एम.के. प्रसन्ना, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, महानगर पालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, शासकीय वैदयकीय महाविदयालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर आदींसह इतर अधिकारी  उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबाचे संरक्षण  हा  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारीया मोहिमेचा उदेदश आहे.  ही मोहिम आता सगळीकडे प्रभावीपणे राबविली जाईल, असा विश्वास वाटतो आहे. मराठवाड्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. आरटी-पीसीआर टेस्टची संख्या वाढविणे आवश्यक आहे. ज्यांची अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आली असेल, आणि लक्षण असतील त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट होणे आवश्यक आहे. ग्रेट ब्रिटनसारख्या देशात आता लक्षणे न दिसणाऱ्या पण पॉझिटीव्ह रुग्णांना घरीच उपचार दिले जात आहेत. पण त्यांची दररोज चौकशी केली जाते. त्यांना त्रास होऊ लागल्यास रुग्णालयात दाखल केले जात आहे. आपल्याकडे होम आयसोलेशन आणि होम क्वारंटाईन यांची गल्लत केली जात आहे. होम क्वारंटाईन केलेल्यांना आपण घरी जाऊ देतो. पण लक्षणे न दिसणारी अशी मंडळी बाहेर फिरू लागतात आणि त्यांच्यामुळे अन्य काहींपर्यंत विषाणू पोहचू लागला आहे.

दरम्यान,  जगभर आता या विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट येईल, असे म्हटले जात आहे. कारण आर्थिक चक्र फिरवण्यासाठी तरूण पिढी बाहेर पडू लागली आहे. ती कामावर जाऊ लागली आहे. पण त्यांच्यामुळे घरच्या ज्येष्ठांपर्यंत विषाणू पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता आपल्याला जनजागृतीवर मोठा भर द्यावा लागणार आहे. ब्रिटनमध्ये मास्क न वापरण्यांना मोठा दंड करणे सुरु केले आहे. त्यामुळे आपल्याकडेही आता बाहेर पडताना मास्क घातलाच पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी दंड करणेही आवश्यक असेल, तर तेही प्रभावीपणे केले पाहिजे.  

ब्रिटन आणि अन्य देशात आता पुन्हा बंधने घालणे सुरु करण्यात आले आहे. रात्री दहानंतर व्यवहार बंद करणे, कार्यक्रमांवर आणि गर्दी रोखण्यासाठीचे उपाय योजले जात आहेत. पुढचे सहा महिने ही बंधने राहतील अशी शक्यताही आहे. त्यामुळे आपल्याकडे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. या मोहिमचा उद्देश स्वरक्षणाचा आहे. मी सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हा या मोहिमेचा गाभा आहे. त्यामुळे आता आपल्याला जनजागृती आणि ट्रेसिंग- टेस्टिंगवर भर द्यावा लागणार आहे. डॉक्टरला रुग्ण वेळेत मिळणे आणि रुग्णाला डॉक्टर सोबतच औषधे मिळणे यांची सांगड घालावी लागणार आहे. औषधं उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. पण त्यांचा वापर करण्याचा निर्णय आणि जबाबदारी ही डॉक्टरांची आहे. त्यासाठी आपण उपचार पद्धतीसाठी मार्गदर्शक सूचनाही तयार केल्या आहेत. कुणाच्या आग्रहावरून किंवा अनावश्यकरित्या औषधांचा वापर होऊ नये याची दक्षता घेण्याची गरज आहे. विशेषतः कोरोना होऊन गेल्यानंतरच्या उपचारातही काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आपण आरोग्य विभागाचा टास्क फोर्स तयार केला आहे. या टास्क फोर्सने निसंकोचपणे राज्यस्तरावरील टास्क फोर्सशी संपर्क साधावा. यातून राज्यातील मृत्यूदर कमीत कमी रहावा यासाठी करता येतील, ते सर्व प्रय़त्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

राज्यात ऑक्सिजनची उपलब्धता आणि त्याच्या वाहतूकीबाबत केंद्र सरकारशी संपर्क साधला आहे. तसेच औषधांच्या उपलब्धतेसाठी राज्यस्तरावरून केंद्रीय पद्धतीने समन्वयन सुरु असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपली ही माझी कुटुंब माझी जबाबदारी मोहिम देशातील नव्हे, जगातील आरोग्य चळवळ ठरेल, असा विश्वास आहे. यात आपल्याला जनतेचा सहभाग वाढवायचा आहे. प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी आपण यातून घेणार आहोत. लहानपणी आपल्याला आई-वडील बाहेरून आल्यानंतर हात-पाय धुवा, स्वच्छतेची काळजी घ्या अशा सवयी लावत. त्यामुळे आता या सूचना ग्रामीण भागापर्यंत आणि तळागाळापर्यंत पोहचविण्याची गरज आहे. प्रत्येक प्रदेशाची एक खासियत आहे, तिथे वेगवेगळ्या लोककलांची परंपरा आहे. या वेगवेगळ्या शैलींचा वापर करून आपल्याला या गोष्टी लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. लॉकडाऊन हवे की जीवनशैली बदलणे परवडेल हे लोकांना पटवून द्यायला हवे. लॉकडाऊनमुळे जगाचेच अर्थचक्र बिघडले आहे. त्यामुळे हे अर्थकारणाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी जीवन शैलीतील बदल स्विकारावे लागतील. स्वचःची काळजी घेऊन कामांसाठी बाहेर पडावे लागेल. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी यांनी नो मास्क नो एन्ट्री हे धोरण राबविणे सुरु केले आहे. मास्क नसेल तर दुकानात प्रवेश नाही. जो दुकानदार मास्क वापरणार नाही, त्याच्याकडूनही खरेदी नाही, अशी भुमिका घेण्याचे लोकांना आवाहन केले आहे. कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर माझे काय होईल, या भितीने काहीजण तपासणीसाठी पुढे येत नाहीत. तर काही मला काही होत नाही म्हणून बेपर्वाईने वागतात. या दोन्हीतून आपल्याला मार्ग काढून विषाणू प्रसार रोखायचा आहे, असे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करा – या आधीचे सणवार आपण साधेपणाने साजरे केले आहेत. गणेशोत्सवही आपण साधेपणाने साजरा करण्यात यशस्वी झालो. आता आपल्याला येणारा नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करायचा आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे सूचना निर्गमित करण्यात येतील.

दरम्यान, मुख्यमंत्री  श्री. ठाकरे यांनी  आठही जिल्हयातील जिल्हाधिकांऱ्यांशी  संवाद साधून  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारीया मोहिमेचा सविस्तर आढावा घेतला. या मोहिमे अंतर्गत जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. या मोहिमेचा महत्त्वाचा सिम्बॉल जनजागृती करताना वापरण्याची सूचना त्यांनी केली. नांदेडने तयार केलेल्या होम आयसोलेशन किटबददल  त्यांनी समाधान व्यक्त केले तर  बीड जिल्हयात प्रत्येकाच्या दारावर मोहिमेच्या सिम्बॉलचे स्टीकर लावण्याच्या  निणर्याचे कौतुक केले.

औरंगाबाद जिल्हयाचे पालकमंत्री  सुभाष देसाई म्हणाले की,  औरंगाबाद जिल्हयात  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. स्थानिक लोककलावंतांच्या माध्यमातून ही मोहिम तळागाळापर्यंत पोहाचविण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच जनजागृतीसाठी धर्मगुरु यांचेही सहकार्य घेतले जाईल. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही  जिल्हयात मोहिम यशस्वी केली जाईल, असे सांगितले. तसेच  ऑक्सिजनच्या पुरवठयातील अडचणी दूर कराव्यात, असे ते म्हणाले. जालना जिल्हयाचे पालकमंत्री  राजेश टोपे म्हणाले की,  जिल्हयात  कोरोनाच्या नियंत्रणासाठी सुरुवातीपासूनच दक्षता घेतली जात आहे.  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी लोकांचा प्रतिसाद लाभावा, यासाठी प्रयत्न केला जाईल. लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी मोहिमेचे कौतुक करुन जिल्हयात मोहिम उत्तम प्रकारे राबविण्यात येत असल्याचे सांगितले. 15 ऑक्टोबर नंतर मोहिमेचा विस्तार करुन नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे ते म्हणाले. परभणीचे पालकमंत्री  नवाब मलिक यांनी  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेसाठी लोकांचे चांगले सहकार्य मिळत आहे.  लोकप्रतिनिधीही सहकार्य करत आहे. मोहिमेबददल कुणाचीही  तक्रार नाही. ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यात येईल, असे ते म्हणाले. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंढे म्हणाले की, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्वपक्षीय मेळावा घेण्यात आला.  सर्व लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभत आहे. अतिशय प्रभावीपणे  जिल्हयात मोहिम राबविण्यात येत आहे.

यावेळी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगर पालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर बीडचे  जिल्हाधिकारी राहूल रेखावार, उस्मानाबादचे‍ जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आपआपल्या जिल्हयात राबविण्यात येत असलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती दिली.

***

 

No comments: