07 September, 2020

बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली दि.07: केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कार दिला जातो. बाल शक्ती पुरस्कार-2021 व बालकल्याण पुरस्कार-2021 साठी केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. हे अर्ज www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. या पुरस्काराची माहिती वरील संकेतस्थळावर देण्यात आलेली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर, 2020 असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.  

 बाल शक्ती पुरस्कार : ज्या मुलांनी (वय 05 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना हा बाल शक्ती पुरस्कार दिला जातो.

बाल कल्याण पुरस्कारांमध्ये वैयक्तिक पुरस्कार आणि संस्थास्तरावर पुरस्कार असे दोन भाग आहेत.

वैयक्तिक पुरस्कार :  मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 07 वर्ष काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.

संस्था स्तरावर : बाल कल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्ष सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.

*****

No comments: