24 September, 2020

पोलीस पेट्रोल पंपावर गुणवत्ता व विश्वासार्हता जोपासण्यात येईल -- नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी

 


                * हिंगोली पोलीस पेट्रोल पंप, बास्केट बॉल व स्केटींग ग्राऊंड, ग्रॉसरी शॉपचे उद्घाटन संपन्न.

            हिंगोली, दि.24: पोलीस कल्याण निधी अंतर्गत उभारण्यात आलेल्या पेट्रोल पंपावर गुणवत्ता व विश्वासार्हता जोपासण्यात येणार असून त्याचा दर्जाही चांगला राहणार आहे. त्यामुळे या पेट्रोल पंपावर तक्रारींसाठी कोणत्याही प्रकारचा वाव राहणार नसल्याचे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी केले.

            येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या शेजारी इंदिरा चौकात उभारण्यात आलेल्या पोलीस पेट्रोल पंपाचे, पोलीस वसाहतीतील बास्केट बॉल व स्केटींग ग्राऊंड व ग्रॉसरी शॉपचे उद्घाटन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा प्रशासन अधिकारी रामदास पाटील, इंडियन ऑईलचे औरंगाबाद विभागाचे उप महाप्रबंधक सुहास तुमाने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

            यावेळी बोलतांना श्री. तांबोळी म्हणाले की, स्नेह व प्रेमाची जाणीव ठेवून हा पेट्रोल पंप चालणार आहे. या पेट्रोल पंपाच्या माध्यमातुन मिळणा-या उत्पन्नाचा पोलीस कल्याण निधीसाठी वापर करण्यात येणार असून पोलीस विभागातील अधिकारी  व कर्मचारी यांच्यासह त्यांच्या कुटुंबासाठी वैद्यकीय, शिक्षण तसेच लग्नसमारंभासाठी उपयोग करण्यात येणार आहे. या पंपाच्या उभारणीसाठी ज्यांचे सहकार्य लाभले त्यांचे आभार मानून या पेट्रोल पंपाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.

            जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी या पेट्रोल पंपाच्या योगदानामूळे पोलीस कल्याण निधीला सृदृढ बनविण्याचे सत्कार्य घडणार असून पोलीस सृदृढ असल्यास सारा देश सृदृढ राहील असे सांगून या पेट्रोल पंपाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करुन शुभेच्छा दिल्या.

            पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी आपल्या प्रास्ताविकात पेट्रोल पंप उभारणी मागची भूमिका विशद करतांना सांगितले की, हा पेट्रोल पंप केवळ सहा महिन्यात पूर्ण करण्यात आला आहे. हा पंप विश्वासात कधीही कमी पडणार नाही. येथील सर्व हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याठिकाणी शुध्द पेट्रोल, डिझेल भरुन पोलीस विभागास सहकार्य करावे, असे आवाहन केले. याप्रसंगी आमदार तान्हाजी मुटकुळे आणि इंडियन ऑईलचे औरंगाबाद विभागाचे उपमहाप्रबंधक सुहास तुमाने यांनी आपले मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.

            कार्यक्रमाच्या प्रारंभी कोव्हीड-19 मुळे निधन झालेल्या राज्य राखीब पोलीस बलाचे पोलीस निरीक्षक कुंडलीक अंभोरे यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते पेट्रोल पंपाच्या उभारणीसाठी योगदान दिलेल्या कंत्राटदार, अधिकारी-कर्मचारी यांचा रोपटे देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने यांनी केले. कार्यक्रमास पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिकांची उपस्थिती होती.

****

 

No comments: