11 September, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी प्रवासी बसधारकांनी अंमलात आणावयाची मानक कार्यपध्दती जाहीर

 


        हिंगोली, दि.11 : परिवहन आयुक्त यांच्याकडून आंतरराज्य वाहतूक करतांना खाजगी प्रवासी बसेसनी अंमलात आणावयाची मानक कार्यपध्दती (Standard Operating Procedure i.e.SOP) या बाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार खाजगी प्रवासी बस ऑपरेटर यांनी कोव्हीड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाने निर्गमित केलेल्या खालील निर्देशांचे व सूचनाचे तंतोतंत पालन करावे.

प्रत्येक वाहन चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणे. तसेच प्रवास करणारा गट बदलतांना प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे व प्रत्येक फेरीअंती बसचे निर्जंतुकीकरण करावे. बसचे आरक्षण कक्ष, कार्यालय, चौकशी कक्ष स्वच्छ ठेवावे व उपस्थित कर्मचाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. बसेस जिथे उभ्या राहतात त्याठिकाणी गर्दी होऊ देवू नये. मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये. बसच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे. बसमध्ये काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावेत.  बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात यावी. कोव्हिड-19 आजाराची प्राथमिक लक्षणे (सर्दी, ताप, खोकला) दिसत असल्यास त्यास प्रवासास प्रतिबंध करण्यात यावा. कंत्राटी बस (सिटींग) वाहनामध्ये एका आड एक प्रवासी या पध्दतीने आसनस्थ होतील व स्लिपर बस मध्ये डबल बर्थ वर एक प्रवासी व सिंगल बर्थ वर एक प्रवासी याप्रमाणे वाहतूकीस परवानगी असेल. चालकाने प्रवासादरम्यान जेवन, अल्पोहार, प्रसाधनग्रहाचा वापर करण्यासाठी बस थांबवितांना ही ठिकाणे स्वच्छ आहेत याची खात्री करावी. तसेच बसमध्ये चढतांना, उतरतांना व खानापानाकरिता व प्रसाधनग्रहाच्या वापराकरिता प्रवासादरम्यान शारिरीक अंतर पाळतील याची दक्षता घ्यावी. प्रवाशांना बसमध्ये कचरा फेकू देवू नये व कचराकुंडीचा वापर करावा. प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करणे तसेच त्याचे अभिलेख ठेवणे याची जबाबदारी परवानाधारकाची असेल.

            उपरोक्त सुचनांचे पालन न केल्यास परवानाधारकाविरुध्द मोटार वाहन अधिनियम 1988 केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार उचित कायदेशिर कारवाई करण्यात येईल. याची नोंद घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

****

No comments: