15 September, 2020

जिल्ह्यात ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा शुभारंभ

 




§ कोरोनाविरुध्द लढ्याकरीता महत्वाचे शस्त्र ठरणार मोहिम

 

            हिंगोली,दि.15: जिल्ह्यातील नागरिकांना स्वसंरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी आजपासून ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा शुभारंभ आज हिंगोली, कळमनुरी आणि वसमत येथील उपविभागीय कार्यालयात करण्यात आला.

यावेळी हिंगोली येथे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसिलदार गजानन शिंदे, गटविकास अधिकारी मिलींद पोहरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोराडे तर कळमनुरी येथे तहसिलदार कैलासचंद्र वाघमारे, गट विकास अधिकारी श्री. आंधळे, आरोग्य अधिकारी डॉ. शेख रऊफ आणि वसमत येथे उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी, प्र.तहसिलदार सचिन जयस्वाल, आरोग्य अधिकारी देशमुख यांची उपस्थिती होती.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने 15 सप्टेंबर, 2020 पासून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही महत्वकांक्षी आरोग्य सर्वेक्षण मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक कुटूंबाच्या घरी जाऊन नागरिकांची चौकशी, तपासणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोना विरुद्ध लढतांना घ्यायची काळजी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. ही मोहिम दोन टप्प्‌यात राबविण्यात येणार असून पहिला टप्पा हा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर तर दुसरा टप्पा हा 14 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 24 प्राथमिक आरोग्य केंद्रात या मोहिमेची आज शुभारंभ करण्यात आला असून जिल्ह्यात ही मोहिम यशस्वीरित्या राबविण्याकरीता आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते यांची मदत घेतली जाणार आहे. याकरीता एक पुरुष व एक महिला असे स्वयंसेवकाचा समावेश असलेली पथके तयार करण्यात येणार असून पाच ते दहा पथकामागे एक वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

ाभाया मोहिमेच्या माध्यमातून पथकामार्फत प्रत्येक कुटूंबाच्या घरी जाऊन प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच सदर पथक हे प्रत्येक कुटुंबाला एक महिन्याच्या कालावधीत दोनवेळा भेट देणार आहे. हे पथक शहरातील तसेच जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांपर्यंत घरोघरी जाऊन कुटूंबातील सदस्यांची ताप आणि ऑक्सिजनची तपासणी करणार आहे. तसेच नागरिकांना आरोग्य शिक्षण आणि महत्वाचे आरोग्य संदेश देणे, संशयित कोरोना रुग्ण शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांना उपचार आणि आरोग्य विषयक सेवा उपलब्ध करुन देणार आहेत. यामुळे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयीतांचा शोध घेवून त्यांना वेळीच आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे.

            सद्या कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने लोकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. त्यांची भिती दूर करुन त्यांना आधार देण्याचे काम देखील या पथकामार्फत करण्यात येणार आहे.      या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक कुटूंबापर्यंत जाऊन कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वसंरक्षणाच्या उपाययोजनांचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. कोरोनापासून बचावासाठी राज्य शासनाने आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा उभारण्याचे काम केले आहे. आता लोकसहभागातून कोरोनाच्या महामारीची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही महत्वकांक्षी मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ ही महत्वकांक्षी मोहिम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे जिल्हा प्रशासनामार्फत अवाहन करण्यात येत आहे.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुखांसह अधिपरिचारीक, स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

****

No comments: