· गंभीर रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळण्यासाठी नियोजन करा
येथील डीपीसी सभागृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्री. जयवंशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, वसमतचे उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी, हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची उपस्थिती होती.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने 15 सप्टेंबर, 2020 पासून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचे दोन टप्पे असून पहिला टप्पा हा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर तर दुसरा टप्पा हा 14 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ही मोहिम जिल्ह्यातील नागरिकांसाठी असून त्यासाठी पथक नेमण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात ही मोहिम यशस्वीरित्या राबविण्याकरीता आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते यांची मदत घ्यावी. एक पुरुष व एक महिला असे स्वयंसेवकाचा समावेश असलेली पथके तयार करावीत. तसेच पाच ते दहा पथकामागे एक वैद्यकीय अधिकारी निश्चित करावा. ज्या भागात तपासणीसाठी जावयाचे आहे त्या भागातील पोलीस यंत्रणेला पूर्वसूचना द्यावी. या पथकामार्फत प्रत्येक कुटूंबाच्या घरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला एक महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक भेट देणार असून या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे आणि या सर्व्हेतून एकही कुटूंब वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. सदर मोहीम यशस्वी राबविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होवून आपल्या घरी तपासणी करण्यासाठी येणाऱ्या पथकाला सहकार्य करावे.
हे पथक शहरातील तसेच जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांपर्यंत घरोघरी जाऊन लोकांची ताप आणि ऑक्सिजन तपासणी करणार आहे. तसेच नागरिकांना आरोग्य शिक्षण आणि महत्वाचे आरोग्य संदेश देणे, संशयित कोरोना रुग्ण शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांना उपचार आणि आरोग्य विषयक सेवा उपलब्ध करुन देणार आहेत. यामुळे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयीतांचा शोध घेवून त्यांना वेळीच आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे. सध्या कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने लोकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. त्यांची भिती दूर करुन त्यांना आधार देण्यास प्राधान्य द्यावे, असे ही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
या मोहिमेमध्ये घरोघरी जावून आरोग्य विषयक चौकशी केली जाणार असून यासाठी वार्ड व गावनिहाय पथकांची नियुक्ती करण्यात यावी. प्रत्येक पथकामार्फत दर दिवशी किमान 50 घरामधील व्यक्तींची चौकशी तसेच पल्स ऑक्सिमीटर व थर्मल गनच्या सहायाने तपासणी करण्यात येणार आहे. ही मोहिम राबविताना वार्ड, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी तालुका व जिल्हास्तरावर स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून त्यांचे सहकार्य घ्यावे. कामावर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक पाच गावासाठी एक पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केल्या.
अनलॉक
प्रक्रिया सुरु झाल्यापासून दिवसेंदिवस गंभीर रुग्णांची वाढ होत आहे. गंभीर
रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळण्यासाठी जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचा
पुरवठ्याचे योग्य नियोजन करावे. त्यामुळे ज्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज आहे त्या
रुग्णाला जेवढी गरज आहे तेवढे ऑक्सिजन देण्यात यावे. संबंधीत रुग्णाला ऑक्सिजन
चालू आहे का नाही याबाबतही लक्ष ठेवावे. ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा.
नियमितपणे ऑक्सिजनचा आढावा घेण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या
अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे. दोन ते चार दिवस पुरेल एवढा ऑक्सिजन
उपलब्ध असतानाच ऑक्सिजनची मागणी नोंदवावी अशा सुचनाही यावेळी जिल्हाधिकारी यांनी
केल्या.
सद्यपरिस्थितीत
रुग्णांची संख्या वाढत असल्याने संबंधित गावातील व शहरातील शाळेत क्वारंटाईन सेंटर
सुरु करावे आणि त्या ठिकाणी संशयित रुग्णांची सोय करावी, अशा सूचना ही जिल्हाधिकारी
जयवंशी यांनी यावेळी दिल्या.
यावेळी
सर्व तालुक्यांचे तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह
संबंधित सर्व विभागांचे अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment