29 January, 2026

शालांत व उच्च माध्यमिक परीक्षांसाठी जिल्हा दक्षता समितीची बैठक संपन्न

 


 

कॉपीमुक्त परीक्षेसाठी कडक उपाययोजना करा-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारीमार्च २०२६ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा दक्षता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांच्यासह पोलीस विभाग, महावितरण, डायट व इतर विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

परीक्षा निर्भय व कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी भरारी पथक व बैठे पथक नियुक्त करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. प्रत्येक परीक्षा केंद्रासाठी केंद्रनिहाय नोडल अधिकारी नेमावेत तसेच पर्यवेक्षक व समवेक्षकांची नियुक्ती करावी. बैठे पथकात नायब तहसीलदार व विस्तार अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक महिला व एक पुरुष पोलीस कर्मचारी, तर संवेदनशील केंद्रांवर दोन महिला व दोन पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, असेही त्यांनी सांगितले.

गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी भरारी व बैठे पथकांनी दक्षता घ्यावी. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. कोणत्याही परीक्षा केंद्रावर कॉपी प्रकार आढळून आल्यास संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

यावेळी शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी माहिती देताना सांगितले की, इयत्ता दहावीची परीक्षा दिनांक 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार असून जिल्ह्यातील 54 परीक्षा केंद्रांवर 16 हजार 687 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यापैकी 4 परीक्षा केंद्रे संवेदनशील आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा दिनांक 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार असून 39 परीक्षा केंद्रांवर 15 हजार 241 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये 7 परीक्षा केंद्रे संवेदनशील आहेत. दहावीच्या 54 व बारावीच्या 39 अशा सर्व परीक्षा केंद्रांवर प्रत्येकी एक बैठे पथक नियुक्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

*******

No comments: