हिंद दी चादर कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन
• सेलिब्रिटी, रिल्स स्टार्सनी रिल्सच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे आवाहन
हिंगोली, दि.१९ (जिमाका) नांदेड येथे येत्या २४ व २५ जानेवारी रोजी “हिंद दी चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जय वंशी,विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू असून विविध विभागांमार्फत समन्वयाने कामकाज करण्यात येत आहे.
हिंगोली जिल्ह्यात “हिंद दी चादर” या ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध स्पर्धा व उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. प्रभात फेरी, निबंध, वक्तृत्व तसेच चित्रकला स्पर्धांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये कार्यक्रमाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून हे उपक्रम विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या निर्देशानुसार राबविण्यात येत आहेत.
विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सर्व नऊ समाजातील नागरिकांनी “हिंद दी चादर” कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश बळकट करावा, असे आवाहन केले आहे. तसेच लोकप्रतिनिधी, सेलिब्रिटी, पत्रकार, समाजातील व्यापारी व विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा. नागरिकांनी व्हिडीओ रिल्स तयार करून या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी सांगितले.
प्रभात फेरीद्वारे प्रभावी जनजागृती
“हिंद दी चादर” अंतर्गत जनजागृतीसाठी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये उत्स्फूर्तपणे प्रभात फेरी काढण्यात आल्या. कळमनुरी तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा पिंपराळा, प्राथमिक शाळा उर्ध्व पैनगंगानगर, पीएमश्री प्राथमिक शाळा आखाडा बाळापूर, प्राथमिक शाळा एकघरी, केंद्र प्राथमिक शाळा पोत्रा, प्राथमिक शाळा गोरक्षनगर, तसेच प्राथमिक शाळा रुद्रवाडी येथे विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.
या प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये, फलक व संदेशांच्या माध्यमातून “हिंद दी चादर” कार्यक्रमाचे महत्त्व नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविले. या उपक्रमांमुळे सामाजिक सलोखा, बंधुता व ऐतिहासिक परंपरेबाबत जनजागृती वाढत असून कार्यक्रमाला व्यापक प्रतिसाद मिळत आहे.
*****

No comments:
Post a Comment