‘हिंद दि चादर’ उपक्रमांतर्गत नरसी नामदेव येथे वारकरी संमेलनास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीत प्रारंभ
हिंगोली, दि. १९ (जिमाका) : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या हिंद दी चादर या कार्यक्रमाला जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज नरसी नामदेव येथे केले.
नांदेड येथे होणा-या ‘हिंद दि चादर’ या उपक्रमांतर्गत संत नामदेव यांच्या नरसी नामदेव येथे वारकरी संमेलनाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रारंभ झाला. हे वारकरी संमेलन आज सोमवार, (दि.१९) रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत उत्साहात संपन्न झाले.
या संमेलनासाठी पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी उपस्थित वारकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी-सुविधांची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.
यावेळी त्यांनी संत नामदेव महाराजांचे दर्शन घेतले तसेच विणेकरी समाजाचेही दर्शन घेत संपूर्ण परिसराची पाहणी केली. कार्यक्रमासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण अथवा कमतरता भासू नये, याबाबत प्रशासनाला त्यांनी आवश्यक सूचना दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस अशासकीय सदस्य ॲड. संतोष राठोड यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी उपस्थित वारकरी व भाविकांना मार्गदर्शन केले. या वारकरी संमेलनातून सामाजिक एकात्मता, सहिष्णुता व धार्मिक सलोखा यांचा संदेश देण्यात आला असून ‘हिंद दि चादर’ उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंजाबी समाज, सिख समाज, सिंधी समाज, सिकलीगर समाज, वाल्मिकी समाज, बंजारा समाज तसेच इतर विविध समाजांतील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
*****





No comments:
Post a Comment