15 January, 2026

जिल्ह्यातील दिव्यांगांना स्कूटर योजनेचा लाभ देण्यासाठी आज ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड

 


हिंगोली, दि. 15(जिमाका) : हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना स्कूटर खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्याच्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड ईश्वर चिठ्ठीद्वारे उद्या शुक्रवार, (दि.16) रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद हिंगोली येथे करण्यात येणार आहे. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय हिंगोली यांच्यावतीने ही निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

या योजनेसाठी सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्या मार्फत अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयास एकूण 578 अर्ज प्राप्त झाले. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर 95 अर्ज पात्र ठरले आहेत. या पात्र प्रस्तावांमधून 30 लाभार्थ्यांची निवड ईश्वर चिठ्ठीद्वारे करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रहिवासी असलेल्या तसेच 40 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या दिव्यांग व्यक्तींना स्कूटर खरेदीसाठी प्रत्येकी रुपये 50 हजार इतके अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेमुळे दिव्यांग व्यक्तींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करणे सुलभ होणार असून त्यांच्या स्वावलंबनाला चालना मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी निवड प्रक्रियेसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद, हिंगोली येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्रीमती गिता गुट्टे यांनी केले आहे.

*****

No comments: