26 January, 2026

प्रजासत्ताक दिनी राज्य शासनाचा विकासाचा संकल्प : शेतकरी, आरोग्य, शिक्षण व रोजगारासाठी शासनाची भरीव कामगिरी– पालकमंत्री नरहरी झिरवाळ

 



* संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम 

* विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार 


हिंगोली, दि. 26 (जिमाका): जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध महत्त्वाकांक्षी आणि लोककल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांमुळे शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात भरीव व सकारात्मक बदल घडून येत आहे. या सर्व योजनांच्या माध्यमातून राज्य शासन सर्वांगीण विकासाचा संकल्प करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. 

  हिंगोली येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी पालकमंत्री श्री. झिरवाळ बोलत होते. 

यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार चंद्रकांत उर्फ राजु नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक नीलभ रोहण, अपर जिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य वित्त व लेखा अधिकारी दिगांबर माडे, सेनगाव नगर पंचायतचे मुख्याधिकारी योगेशकुमार मीना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. जी. पोत्रे, अधिष्ठाता चक्रधर मुंगल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी गीता गुठ्ठे, मुख्याधिकारी अरविंद मुंडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, अश्विन माने, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी जी. जी. चितळे, प्रदीप नळगीरकर, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, आसावरी काळे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी –कर्मचारी उपस्थित होते.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पायाभूत सुविधा, कृषी, आरोग्य, शिक्षण, रोजगार व सामाजिक न्याय क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती होत असल्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ता योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी पाच गावांमध्ये एकूण 22 किलोमीटर शेत व पाणंद रस्त्यांची कामे सुरू असून, शेतकऱ्यांना थेट बांधापर्यंत सहज पोहचणे सोपे आणि सुलभ होणार असल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यावेळी म्हणाले. 

यंदा सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे ४७५.९६ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित ई-केवायसी प्रलंबित शेतकऱ्यांनी तात्काळ प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. ॲग्रीस्टॅक योजनेतून शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येत असून, कृषी योजनांचा लाभ अधिक सुलभ झाला आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून सिंचनासाठी ७४७ शेतकऱ्यांना दीड कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले आहे. तसेच कृषी यांत्रिकीकरणासाठी ४४१ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून २७८ शेतकऱ्यांना १.४१ कोटी रुपयांचे अनुदान शासनाने वितरीत केल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

हिंगोली जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीतून दर्जेदार आरोग्य सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे. तसेच ‘संजीवनी अभियान’ अंतर्गत जिल्ह्याला देशात प्रथम क्रमांकाचा स्कॉच अवॉर्ड मिळाला असून, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तो स्विकारल्याचे त्यांनी सांगितले. 

‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानांतर्गत गावोगावी सर्वेक्षण, तपासणी, उपचार व समुपदेशन सुरू आहे. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन (एन-क्वास) कार्यक्रमांतर्गत रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे मानांकन करण्यात येत असल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी जिल्ह्यात रोजगार, उद्योग व महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत असल्याचे सांगितले. 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून २६७६ युवकांना प्रशिक्षण देऊन २३.७१ कोटी रुपयांचे विद्यावेतन वितरित करण्यात आले आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत ११४५ लाभार्थ्यांना ८६ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले असून, व्याज परतावा थेट खात्यावर जमा करण्यात आला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत १५ हजारांहून अधिक महिलांचे बचत गटांच्या माध्यमातून संघटन झाले असून, उद्योग व रोजगारासाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

 ‘सेवादूत हिंगोली’ वेब प्रणाली, व्हॉट्सॲप चॅटबोट (९४०३५ ५९४९४) व ‘से हाय टू कलेक्टर’ (८५४५० ८५४५०) या प्रणालींमुळे नागरिकांच्या तक्रारींचे जलद, पारदर्शक व सुलभ निराकरण होत आहे. DM Dashboard द्वारे सर्व विभागांची माहिती एकत्रित उपलब्ध करून देत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, स्वाधार योजना व वसतिगृह सुविधा राबविण्यात येत आहेत. संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा व अपंग योजना अंतर्गत हजारो लाभार्थ्यांना थेट बँक खात्यावर अनुदान वितरित करण्यात आले आहे. 

तसेच शिधापत्रिकाधारकांसाठी रोख हस्तांतरण योजना, ग्रामीण रोजगार हमी योजना व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांद्वारे दुर्बल घटकांना मोठा आधार मिळत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानातील समता, सामाजिक न्याय, विकास व स्वावलंबनाच्या मूल्यांना अनुसरून जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शेतकरी, युवक, महिला, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी सुरू असलेली ही विकासयात्रा अधिक गतिमान करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. यावेळी सरजुदेवी कन्या विद्यालय, शां. मु. दराडे विद्यालय, मौलाना आझाद उर्दु हायस्कुल आणि सरस्वती विद्या मंदिर, हिंगोलीतील विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांवर संगीत कवायत केली. यावेळी बालविवाह प्रतिबंधक शपथ आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.  

*****








No comments: