17 January, 2026

हिंद-दी-चादर कार्यक्रमानिमित्त नरसी नामदेव येथे होणाऱ्या वारकरी संमेलन प्रचाररथाला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट


हिंगोली (जिमाका), दि.१७ : श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या त्याग, बलिदान व धार्मिक स्वातंत्र्याच्या संदेशावर आधारित “हिंद दी चादर” या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने नरसी नामदेव येथे सोमवार, दि. १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या वारकरी संमेलनाच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात फिरणाऱ्या वारकरी संमेलन प्रचाररथास आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शहरातील महात्मा गांधी पुतळा परिसरात भेट देऊन पाहणी केली.
 
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रचाररथावर साकारण्यात आलेल्या वारकरी संप्रदायाच्या समृद्ध परंपरेविषयी, संतांच्या शिकवणी, अभंग, हरिपाठ तसेच नरसी नामदेव येथे होणाऱ्या वारकरी संमेलनाच्या कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती घेतली. “हिंद दी चादर” कार्यक्रमातून श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांनी समाजासाठी दिलेल्या त्याग, समता, धार्मिक सहिष्णुता व मानवतेच्या मूल्यांशी वारकरी संप्रदायाचे विचार सुसंगत असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
वारकरी संप्रदायाने समाजाला दिलेला समतेचा, अहिंसेचा, सदाचाराचा व भक्तिमार्गाचा संदेश आजच्या पिढी पर्यंत पोहोचविण्यासाठी अशा प्रचाररथांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, या माध्यमातून सामाजिक एकोपा व सद्भावना वृद्धिंगत होईल, असे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले.
 
नरसी नामदेव येथे दि. १९ जानेवारी रोजी होणाऱ्या वारकरी संमेलनानंतर हा प्रचाररथ हिंगोली जिल्ह्यातील विविध तालुके व गावांमध्ये जनजागृती करत पुढे दि. २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या “हिंद-दी-चादर” कार्यक्रमासाठी नांदेडकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या माध्यमातून हिंद-दी-चादर कार्यक्रमाचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्यात येणार आहे.
 
नरसी नामदेव येथील वारकरी संमेलन तसेच नांदेड येथे होणाऱ्या हिंद-दी-चादर कार्यक्रमामध्ये सर्व समाजघटकांनी, वारकऱ्यांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. तसेच हे सर्व कार्यक्रम यशस्वी, सुव्यवस्थित व सुरक्षितरीत्या पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
 
वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक, सामाजिक व सांस्कृतिक परंपरा आणि श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या बलिदानाचा गौरव करणारे हे उपक्रम समाजात एकोपा, बंधुता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे ठरतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी व्यक्त केला. 
 
"हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिब जी 350 वा शहीदी समागम जागृती रथयात्रेचे हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून गांधी चौकापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या रथयात्रेचे वेगवेगळ्या ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.  
 
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, श्रीराम दादा बांगर, शिलचंद्रजी देशमुख, महेश बियाणी, सजितसिंग शाहू, जगजीतराज खुराना, कन्हैयालाल नैनवाणी, अंबादास दळवी, स. सुखबीर सिंग अलग, सचिन तिवारी, दिलीप झंवर,स.चरन सिंग सेठी यांच्यासह पंजाबी, सिख, सिंधी, सिकलीगर, वाल्मिकी, बंजारा व इतर समाजातील भाविक सर्व मान्यवर, जिल्हा प्रशासनाचे विविध विभागाचे अधिकारी, संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी, वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी, कीर्तनकार, भजनी मंडळांचे सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
00000

No comments: