हिंगोली, दिनांक 05 (जिमाका) : भारतीय विषविज्ञान संशोधन संस्था (CSIR - Indian Institute of Toxicology Research, Lucknow) यांच्या 62 व्या वार्षिक उत्सवाचे औचित्य साधत लखनऊ येथील सोहळ्यात वसमत येथील 'मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र' आणि 'CSIR-IITR' यांच्यात आज सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी वैज्ञानिक तथा औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) च्या महासंचालक आणि भारत सरकारच्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन विभागाच्या (DSIR) सचिव डॉ. एन. कलाइसेल्वी होत्या. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून हरिद्रा केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, माजी केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री तथा कदंब ग्रुपचे संस्थापक- सीएमडी डॉ. अनंतकुमार हेगडे,पद्मश्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे महासंचालक डॉ. जयकर शेट्टी, फेअर लॅब्सचे व्यवस्थापकीय संचालक द्विजेंद्र माथूर, CSIR-IITR संशोधन परिषदेचे अध्यक्ष प्रा. जावेद इक्बाल यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी आपले विचार मांडले.
सीएसआयआर-आयआयटीआरचे संचालक डॉ. भास्कर नारायण, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवी राम, डॉ. के. सी. खुलबे, हरिद्रा संशोधन केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कच्छवे, हळद केंद्राचे करार समन्वय तथा संशोधक सहयोगी डॉ. अनिकेत पाटील, डॉ. प्रसाद गंगाखेडकर, शास्त्रज्ञ नागेश दत्तगोंडे, प्रिया गावंडे, विधी पळसापुरे, तंत्र सहायक पंकज कदम आदी उपस्थित होते.
*कराराचे शेतकरी आणि कृषी अर्थव्यवस्थेसाठी ऐतिहासिक महत्त्व:*
*उच्चस्तरीय वैज्ञानिक पृथक्करण:* हिंगोलीच्या हळदी मधील 'कर्क्युमिन' (Curcumin) आणि इतर औषधी घटकांवर जागतिक मानकांनुसार सखोल जैव- वैज्ञानिक संशोधन केले जाईल.
*आंतरराष्ट्रीय सुरक्षा व दर्जा प्रमाणीकरण :* जागतिक बाजारात निर्यातीसाठी अनिवार्य असलेले विषविज्ञानविषयक सुरक्षा दाखले (Toxicological Safety & Quality Certification) उपलब्ध होऊन जागतिक बाजारपेठेची कवाडे हिंगोलीच्या हळदीसाठी खुली होतील.
*औषधी व सौंदर्य मूल्यवर्धन :* हळदीवर प्रक्रिया करून प्रगत औषधे, न्यूट्रास्युटिकल्स आणि सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती केली जाईल, ज्यामुळे कच्च्या हळदीऐवजी मूल्यवर्धित उत्पादनांमधून शेतकऱ्यांच्या मालाला थेट परकीय चलनातील दर मिळणे सुलभ होईल.
*हिंगोली 'सुवर्णक्रांती'चे जागतिक केंद्र :* स्थानिक शेतकऱ्यांच्या घामाला देशातील सर्वोच्च शास्त्रीय संशोधनाची जोड देऊन हिंगोली जिल्ह्याला खऱ्या अर्थाने जागतिक 'सुवर्णक्रांती'चे नेतृत्व मिळवून देणारा हा करार ठरला आहे.
*****
No comments:
Post a Comment