05 November, 2026

शालेय विद्यार्थ्यांच्या वेळेचे भान ठेवून बसचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

जिल्हाधिकारी यांच्याकडून विद्यार्थिनींच्या तक्रारींची तत्काळ दखल

 शाळेतील सर्व वर्गांना विद्यार्थींनींना उपस्थित राहता येणार 

 मौजा मार्ग चिंचोली बस सकाळी 5.30 ला मार्गस्थ होणार

 बस वेळापत्रकात महामंडळाकडून सुधारणा

      हिंगोली, दि. 5 (जिमाका) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह विशेषत: मुलींना शाळेपर्यंत मोफत व सुरक्षित पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून मानव विकास मिशन अंतर्गत बस सेवा कार्यान्वित आहे. या सेवेंतर्गत बस वेळेत उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थिनींना शाळेतील सुरवातीच्या दोन वर्गांना मुकावे लागत होते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या निदर्शनास आले. या समस्येची योग्य दखल घेत ‍त्यांनी विद्यार्थींनींचे शालेय नुकसान होणार नाही, यासाठी बसचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना महामंडळाच्या आगार प्रमुखांना केल्या. त्यानुसार महामंडळानेही बसच्या वेळापत्रकात सुधारणा केली.   

मानव विकासची बस मौजा मार्ग चिंचोली शिवाजी पुतळ्याजवळ निर्धारित वेळेपेक्षा 45 मिनिटे उशीरा धावत असल्याने शालेय विद्यार्थींनीचे नुकसान होत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या निदर्शनास आले. या विद्यार्थिनींशी जिल्हाधिकारी यांनी शिवाजी पुतळा येथे स्वत: संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अडचणी जाणून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थींनींचे होत असलेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन तत्काळ महामंडळाच्या अधिकाऱ्यांना या होत असलेल्या शैक्षणिक नुकसानीबाबत व उशीरा येत असलेल्या बसच्या वेळापत्रकात सुधारणा करण्याबाबत तत्काळ आदेशित केले. तसेच बसचे वेळापत्रक सुधारित करण्याच्या सूचना केल्या. शिवाय कोणत्याही बस उशीरा धावणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचेही महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. 

विद्यार्थिनींना शाळेत वेळेत पोहोचता येऊन त्यांना शाळेतील सुरुवातीच्या दोन तासांना आता यापुढे मुकावे लागणार नाही. शिवाय त्यांचे शालेय नुकसान होणार नसल्याचेही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले.

  *मौजा मार्ग चिंचोली बस सकाळी  5.30 ला धावणार*
           जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशानुसार  ‍हिंगोली आगारातून सुटणारी मौजा मार्ग चिंचोली बस सकाळी सहा ऐवजी 5.30 वाजता मार्गस्थ होणार असल्याचे आगार व्यवस्थापक आनंद धर्माधिकारी यांनी सांगितले. विद्यार्थिनींच्या शैक्षणिक नुकसानाची जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली. यामुळे बसच्या वेळापत्रकात निर्धारित वेळेच्या अर्ध्या तास अगोदर असा बदल करण्याचा निर्णय आगाराने घेतला आहे.  भविष्यात अशी बाब होणार नाही, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
********

No comments: