पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना
१२ हजार १८ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित
ई-केवायसी पूर्ण करून घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
हिंगोली, दि. ५ (जिमाका) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील एकूण ६६ हजार २३४ शेतकऱ्यांना आतापर्यंत ६२७ कोटी ४७ लाख १७ हजार ३४६ रुपये चार नोव्हेंबरपर्यंत अदा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली. तसेच उर्वरित पात्र शेतकऱ्यांना अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याचेही ते म्हणाले.
आतापर्यंत जिल्ह्यात चार टप्प्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या याद्यांमध्ये एकूण ८० हजार ७५६ पात्र शेतकरी आहेत. त्यापैकी ६८ हजार ७३८ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली असून, १२ हजार १८ शेतकऱ्यांची प्रक्रिया प्रलंबित आहे. संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
फार्मर आयडी आवश्यक
पात्र शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढणे आवश्यक आहे. फार्मर आयडीशिवाय योजनेचा लाभ मिळणार नाही. पात्र शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असल्यास त्यांच्या वारसांनी सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करून फार्मर आयडी काढण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. योजनेतील अनुदान, आधार प्रमाणीकरण किंवा फार्मर आयडीबाबत तक्रार अथवा शंका असल्यास https://flrs.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदविता येईल, असे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) सुरेखा फुपाटे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment