हिंगोली, दि. 05 (जिमाका) : कापूस उत्पादनात वाढ करून शेतकऱ्यांची उत्पादकता सुधारण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सन 2026-27 मध्ये ‘कापूस उत्पादकता अभियान (कापूस क्रांती)’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. अभियानातील स्थानिक पातळीवरील घटक म्हणून कापूस श्रेडरसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. या घटकाचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या व संस्था तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांना घेता येणार आहे.
महाडीबीटी पोर्टलवर अर्जाची सुविधा
कापूस श्रेडर घटकासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. लाभार्थ्यांची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना यंत्राच्या किमतीच्या 50 टक्के, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 40 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी कमाल 75 हजार रुपये, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी कमाल 60 हजार रुपये अनुदानाची मर्यादा आहे.
कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन
जिल्ह्यातील पात्र शेतकरी व संबंधित संस्थांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment