26 January, 2021

कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्याने राज्यात वेगळा पॅटर्न निर्माण केला - पालकमंत्री वर्षाताई गायकवाड

 


हिंगोली, दि.26 (जिमाका):  कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील यशस्वी कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने राज्यात एक वेगला पॅटर्न निर्माण केला आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.

            भारतीय प्रजासत्ताकाच्या 71 व्या वर्धापन दिनी आज येथील संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, खा. राजीव सातव, आमदार तान्हाजी मुटकूळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा, राज्य राखीव दलाचे समादेशक संदिपसिंह गिल, प्रभारी  पोलिस अधिक्षक  यशवंत काळे, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीन देशमूख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या की, अनेक देशात कोरोनाने थैमान घातले होते. हिंगोली जिल्ह्यात 3 हजाराहून अधिक जणांना त्याचा संसर्ग झाला असून दुर्दैवाने 56 जणांचा यात मृत्यू झाला आहे. लोक प्रतिनीधी आणि जिल्हा प्रशासनाने आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम केले. जनतेच्या सकारात्मक प्रतिसादामुळे कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यात हिंगोली जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनीधी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यशस्वी झाले असे म्हणता येईल. हिंगोली जिल्ह्याने धैर्याने आणि संयमाने एक वेगळा पॅटर्न राज्यात निर्माण केला. याकरिता हिंगोली जिल्ह्यातील जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.

कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी जिल्ह्यात आज 5 हजार पेक्षा जास्त क्वारंटाईनच्या खाटांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र RT-PCR लॅब कार्यान्वित करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने 360 खाटांची क्षमता असलेले 2 डेडीकेटेड कोव्हिड हॉस्पिटल तयार करण्यात आले आहेत. तर 400 खाटांची क्षमता असलेले 6 डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर तयार करण्यात आले आहेत. तसेच 20 कोविड केअर सेंटर असून त्याची 1 हजार 734 खाटांची क्षमता आहे. यापैकी केंद्रीय ऑक्सीजन पुरवठा पाईपलाईनद्वारे 600 खाटा आणि 87 व्हेंटीलेटर युक्त आयसीयू खाटा आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता असल्याची बाब लक्षात घेवून हिंगोली, कळमनुरी आणि वसमत येथे 13 के.एल. क्षमतेचे 4 लिक्विड ऑक्सिजन टॅंक उभारण्यात आल्याने रुग्णांना आता ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे.

तसेच कोव्हिड रुग्णांसाठी डायलेसीसचा स्वतंत्र वार्ड तयार करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन अंतर्गत 20 कोटी रुपये खर्च करुन जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यात आले. हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात सेंट्रल मॉनिटरींग सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. याद्वारे भरती असलेल्या सर्व रुग्णांची आरोग्य विषयक माहिती एकाच ठिकाणी एका स्क्रिनवर उपलब्ध होते. तसेच याद्वारे रुग्णांच्या आरोग्यावर 24 तास देखरेख ठेवून अचूक उपचार करण्यात येत आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अपंग पुनर्वसन केंद्र सुरु करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा अपंग पूर्नवसन केंद्र उभारण्यात येत असुन, यासाठी आपण जिल्हा नियोजन योजनेतून 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे यावेळी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले.

कोरोनासाठी लसीकरण सुरु झाले असले तरी अजून, धोका कमी झालेला नाही. याकरीता मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, शारिरीक अंतर राखणे या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोनावर उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपायांनी मात केली जाऊ शकते. त्याकरीता नागरिकांनी अधिकाधिक खबरदारी घेण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटूंब-माझी जबाबदारी’ ही मोहिम यशस्वीरित्या राबविली असून राज्यात आणि जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली आहे. जिल्ह्याला 6 हजार 650 लसींचे डोस प्राप्त झाले असून, याद्वारे पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  

            पालकमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड पुढे म्हणाल्या की, माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी बांधवांना चिंतामुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली असुन जिल्ह्यातील 90 हजाराहून अधिक कर्जखात्यांवर 581 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे बाधीत जिल्ह्यात 2 लाख 96 हजार 778 शेतकऱ्यांना मदत म्हणून 229 कोटी 96 लाख निधी लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आला आहे.

तसेच हिंगोली शहरातील रामलीला मैदानाला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे. याठिकाणी सुमारे दीडशे वर्षापासून दरवर्षी दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. आपण जिल्हा नियोजन अंतर्गत सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करुन रामलीला मैदानाचे सुशोभिकरण केले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा, कालच माझ्या हस्ते झाला असून रामलीला मैदान आता लोकोपयोगासाठी खुले झाले आहे. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या वास्तव्याने पुनित झालेले नरसी नामदेव आणि आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ या तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी सन 2020-21 मध्ये जिल्हा नियोजनातून 13 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. येणा-या काळात यासाठी अधिकचा निधी ही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.

ऊर्जा विभागाने राज्यातील प्रत्येक कृषीपंप वीज ग्राहकाला मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरण-2020 जाहीर केले असुन त्याअंतर्गत वीज जोडणीचा किंवा सौर ऊर्जा पंपाचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच कृषी ग्राहकांना दिवसा अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी Online Land Bank Portal तयार करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी शिवभोजन योजने अंतर्गत गरीब व गरजू व्यक्तींना कोरोना प्रादूर्भावाच्या कालावधीत केवळ 5 रुपयांमध्ये सकस आहार देण्यात येत आहे. या योजने अंतर्गत जिल्ह्यातील 9 शिवभोजन केंद्रावर 4 लाखाहून अधीक लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. तसेच कोरोनाच्या कालावधीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत जिल्ह्यातील 8 लाख 57 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना 32 हजार मेट्रीक टन धान्य वितरीत करण्यात आले आहे.

27 जानेवारी म्हणजे उद्यापासून राज्यात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिक्षकांची RT-PCR टेस्ट बंधनकारक केली असुन स्थानिक प्रशासनाने मुलांच्या आरोग्याची सर्व काळजी घ्यावी असे निर्देश दिले आहेत. शासनाने राज्यातील सर्व शासकीय शाळांमधील वीजपुरवठा आणि विजेवरील खर्चाचा प्रश्न सोडविण्यासाठी महाऊर्जा विभागाच्या माध्यमातून सौर ऊर्जा उपकरणे बसवण्याचा निर्णय घेतला असुन बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण पध्दतीत बदल होणे आवश्यक असल्याने राज्यातील सर्व शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.

             यावेळी पालकमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते शहिद सैनिकांच्या विरमाता व विरपिता श्रीमती लक्ष्मीबाई भिकाजी रणविर यांचा शाल व श्रीफळ देवून गौरव करण्यात आला. तसेच सशस्त्र सेना ध्वजदिन निधी-2019 संकलनाच्या उत्कृष्ट कार्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या पुणे सैनिक कल्याण विभागातर्फे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच वन विभागामार्फतही सन 2018-19 मध्ये वनसंरक्षंणाच्या प्रभावी कामांबद्दल व वनसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल सहाय्यक वनसंरक्षक कामाजी गंगाधरराव पवार यांना सुवर्ण पदक मिळाल्याबद्दल त्यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.  तसेच जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2019-20 साठी तलवार बाजीमध्ये गुणवंत खेळाडू म्हणून संदिप कचरु वाघ यांचा 10 हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. बेसबॉल/ कुस्ती खेळासाठी गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून संजय आनंदराव ठाकरे यांचा 10 हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. क्रीडा संघटक/ कार्यकर्ता दत्तराव लिंबाजी बांगर यांचाही 10 हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. सामाजिक न्याय विभागातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त ऑनलाईन जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या निबंध स्पर्धेत प्रथम आलेल्या कु. राणी शामराव सुर्यवंशी यांना 10 हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक आलेल्या कु. ऋतुजा रामचंद्र देशमुख यांना 5 हजार रुपयाचा धनादेश व प्रमाणपत्र व तृतीय क्रमांक आलेल्या कु.आघाव जान्हवी नंदकिशोर यांना अडीच हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र पालकमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते देवून गौरवण्यात आले.

यावेळी उपजिल्हा  निवडणूक अधिकारी गोविंद रणविरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार,  उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक,  पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 ****

No comments: