कोरोना लसीकरणांचे सुक्ष्म व योग्य नियोजन करावे
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
हिंगोली, दि.8 (जिमाका): कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला कोरोनाला पूर्णत: प्रतिबंध
करण्यासाठी राज्य शासनाकडून कोरोनाची लस आणि लसीकरण करण्याचे आदेश कधीही प्राप्त
होऊ शकतात. याकरीता आरोग्य यंत्रणेने लसीकरणाबाबतचे सुक्ष्म व योग्य नियोजन करावे,
असे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कोव्हिड-19 लसीकरण
अंतर्गत जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी बोलत
होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गित्ते, निवासी
वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम आणि प्रशिक्षण केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले की, शासनाकडुन कधीही कोरोनाची लस प्राप्त होऊ शकते.
त्यानुसार आरोग्य यंत्रणेने लसीकरणाबाबतचे सुक्ष्म व योग्य नियोजन करावे. सदर लसीकरण शासनाच्या निर्देशानुसार
प्राधान्याने आरोग्य संबंधित कार्यरत कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत
कोरोना लसीकरण हा अत्यंत महत्वाचा विषय असल्याने आरोग्य व संबंधित यंत्रणांनी
याकडे काळजीपूर्वक, भान ठेवून काम करण्याची आवश्यकता आहे. आपल्या जिल्ह्याची
अंदाजे 14 लाख 50 हजार लसींची साठवणूक करण्याची क्षमता आरोग्य विभागाकडे आहे. तसेच
कोरोना लस साठवणूकीबरोबरच लसीच्या वाहतुकीचेही नियोजन करण्यात यावे. जिल्ह्यातील
24 प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाचे
नियोजन करुन आपली यंत्रणा सज्ज ठेवावी. लसीकरण करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना
योग्य प्रशिक्षण द्यावे.
जिल्हास्तरावरुन आरोग्य संस्थेचे आणि लसीकरण
पथकाचे यूजर आयडी तयार करण्याचे काम वेळेत पुर्ण करावे. कोरोना लस घेणाऱ्यांची
निवड करून त्यांचे ‘कोविन अॅप’ मध्ये लसीकरण सत्र तयार करणे आणि त्याचे मॅपिंग
करण्याचे काम देखील वेळेत पुर्ण करावे. लसीकरण करण्यात येणाऱ्या व्यक्तींना मॅसेज् द्वारे वेळ कळविण्यात
येणार आहे. लसीकरण केंद्रात गर्दी होवून नये, तसेच लसीकरण झालेला व्यक्ती
दूसऱ्याच्या संपर्कात येवू नये यासाठी योग्य नियोजन करावे. ठरविण्यात आलेल्या
प्रक्रियेनुसारच लसीकरणाची कार्यवाही करावी. लसीकरण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी
येण्या-जाण्याचा मार्ग वेगवेगळा करावा. लसीकरण झाल्यानंतर संबंधीत व्यक्तींना
निरिक्षण कक्षात निरिक्षणाखाली ठेवण्यासाठी निरिक्षण कक्षात योग्य नियोजन करावे.
जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गट विकास
अधिकारी यांनी समन्वयाने लसीकरणाचे सुक्ष्म व योग्य नियोजन करावे.
ग्रामीण भागात 24 प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी 2 लसीकरण
केंद्र असे यामध्ये 48 लसीकरण सत्राचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रत्येक सत्रात
100 जण असे एकुण 4 हजार 800 जणांना लसीकरण करण्यात येणार आहे. तर शहरी भागात
हिंगोली-4, वसमत-4, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव प्रत्येकी 2 असे एकुण 14
केंद्रावर 1 हजार 400 जणांना लसीकरण करण्यात येणार आहे.
लसीकरणांची पूर्वतयारी म्हणुन आरोग्य विभागाच्या वतीने आज
जिल्ह्यात 3 ठिकाणी कोरोना लसीकरणाबाबतची यशस्वी रंगीत तालीम घेण्यात आल्याची माहिती ही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
यांनी यावेळी दिली
मागील काही दिवसापासुन कोरोना रुग्णात वाढ होत असल्याचे निदर्शनास
येत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात परदेशातून तसेच बाहेरील शहरातून येणाऱ्या
नागरिकांवर लक्ष ठेवुन त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करावे, असे निर्देश ही
जिल्हाधिकारी जयवंशी यांनी यावेळी दिले.
यावेळी बैठकीस गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी-कर्मचारी
यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment