29 July, 2021


 

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांचे गृहभेटी देऊन समुपदेशन करावे

                                --- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

·         जिल्ह्यातील 111 बालकांना मिळणार बालसंगोपन योजनेचा लाभ

·         प्रती लाभार्थ्यास मिळणार 1100 रुपये मासिक अनुदान

हिंगोली (जिमाका), दि.29:  कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांच्या घरी गृहभेटी देऊन त्यांचे समुपदेशन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा कृती दलाच्या आढावा बैठकीत दिल्या.  

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 27 जुलै, 2021 रोजी जिल्हा कृती दलाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

कोविड साथीच्या काळात पालक गमावलेल्या बालकांचे योग्य संगोपन आणि देखभाल करण्यासाठी जिल्हा कृती दलाची (District Task Force) स्थापना करण्यात आली आहे. कोविड-19 मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 18 वर्षा खालील बालकांची एकूण संख्या 111 झाली आहे. या सर्व बालकांना महिला व बाल विकास विभागाच्या बाल संगोपन योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच कोविड मुळे दोन्ही पालक गमावलेल्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या बालकांची शैक्षणिक फिस देखील शासन स्तरावर भरली जाणार आहे. तसेच कोविड मुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांच्या आर्थिक मालमत्ता बालकांच्या नावे करण्यासाठी शासन स्तरावर मदत केली जात आहे. जिल्ह्यात 111 बालकांपैकी 108 बालकांनी एक पालक गमावले आहेत. तर 03 बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत. या सर्व 111 बालकांना प्रती लाभार्थी 1100 रुपये मासिक अनुदान त्यांच्या बँक खात्यावर मिळणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत दुसरा मजला जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा जिल्हा कृती दल सदस्य सचिव विठ्ठल शिंदे यांनी कळविले आहे.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, बाल कल्याण समिती सदस्या ॲड.वैशाली देशमुख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा जिल्हा कृती दल समन्वयक सरस्वती कोरडे, चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक व जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

******

No comments: