07 July, 2021

 

मधमाशा पालन योजनेसाठी अर्ज करावे

हिंगोली (जिमाका) , दि. 07:  मधमाशा पालन उपक्रमास उद्योग म्हणून चालना देण्यासाठी  महाराष्ट्र शासनाने राज्यात सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य खादी  ग्रामोद्योग  मंडळामार्फत  मध केंद्र योजना (मधमाशा पालन) संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेत समाविष्ट प्रमुख घटक पुढीलप्रमाणे आहेत. त्याचा घटकनिहाय तपशील व पात्रता पुढीलप्रमाणे आहे.

1) वैयक्तीक मधपाळ :  या घटकासाठी अर्जदार साक्षर असावा, स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य , वय  18 वर्षांपेक्षा जास्त असावे .

2) केंद्र चालक प्रगतीशील मधपाळ (व्यक्ती) आणि वैयक्तीक केंद्र चालक (प्रगतीशील मधपाळ) : या घटकासाठी किमान दहावी पास , वय वर्षे 21 पेक्षा जास्त अशा व्यक्तींच्या नांवे अथवा त्या व्यक्तींच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे किमान एक एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन असावी. लाभार्थीकडे मधमाशापालन , प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता व सुविधा असावी .

3) केंद्र चालक संस्था : या घटकासाठी संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे मालकीची किंवा 10 वर्षासाठी भाडेतत्वावर  घेतलेली किमान एक एकर शेत जमीन असावी, संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान एक हजार चौ. फु. सुयोग्य इमारत असावी, संस्थेकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेली संस्था असावी .

योजनेची वैशिष्ट्ये : या योजनेतून मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती करण्यात येणार आहे .

अटी व शर्ती : लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासाठी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील, मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील.

यासाठी पात्र व्यक्ती, संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र व्यक्ती, संस्थांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचे कार्यालय- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, हिंगोली , द्वारा - कक्ष क्र. एस-11, मध्यवर्ती  प्रशासकीय इमारत, नांदेड रोड, हिंगोली  येथे श्री. एस. पी. बगाडे यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक 9822528534 व  dviohingoli@rediffmail.com या ई-मेल पत्यावर संपर्क साधावा. तसेच संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सरकारी बंगला नं.5, महाबळेश्वर, जिल्हा सातारा पिन-412806 (दूरध्वनी-02168-260264) यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

******

No comments: