पोलीसांसाठी नवीन घरे बांधण्याचे काम प्राधान्याने करणार
--- राज्यमंत्री शंभुराज देसाई
- गृह राज्यमंत्री
शंभूराज देसाई यांच्याकडून विविध विभागाचा आढावा
हिंगोली, (जिमाका) दि. 18 : राज्य शासन पोलीसांच्या बाबतीत संवेदनशील असून हिंगोली जिल्ह्यातील
पोलीस दलातील घरांची अवस्था खराब आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीसांसाठी नवीन घरे
बांधण्याचे काम प्राधान्याने करण्यात येईल. तसेच पोलीसांची रिक्त पदे भरण्यासाठी
माहिती संकलीत करण्यात येत आहे. लवकरच पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल, अशी
माहिती राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त,
नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पणन राज्यमंत्री
शंभुराज देसाई यांनी आढावा बैठकीत दिली .
येथील शासकीय विश्रामगृहात गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य
उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पणन आदी विभागाची आढावा बैठक आज
आयोजित करण्यात आली होती . त्याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीस खासदार हेमंत
पाटील, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक राकेश
कलासागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राज्यमंत्री श्री. देसाई यांनी जिल्ह्यातील कोविडजन्य
परिस्थितीचा कामाची माहिती घेऊन कोविडसाठी दिलेला निधी पूर्णपणे खर्च केल्याची व
कोरोना परिस्थिती समाधानकारकपणे हाताळल्याची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. तसेच
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी काय उपाययोजना केले आहेत याची माहिती घेताना
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, बेड, आयसीयू व पुरेशा निधीबाबत योग्य त्या सूचना
केल्या. कोविडजन्य परिस्थितीबरोबरच चक्रीवादळ, महापूर या नैसर्गिक आपत्तीच्या
काळात राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मोलाचे योगदान दिले आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कटिबध्द असुन येणाऱ्या काळात कौशल्य विकासाच्या
विविध योजनेतून ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण गाव
खेड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशा सूचना देवून शेतकरी
व व्यापारी यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याची भूमिका पणन विभागाची आहे. हिंगोली
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी बाजार
समितीची सरासरी उलाढाल व नाविण्यपूर्ण उपक्रमांची विचारणा करत शेतकऱ्यांसाठी काय
सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत याची माहिती घेतली. तसेच सर्व बाजार समितीनिहाय
अहवाल तातडीने सादर करण्याच्या राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सूचना दिल्या.
यावेळी राज्यमंत्र्यांनी नियोजन, वस्तु व सेवा कर, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य
विकास व पणन आदी विभागांचा धावता आढावा घेतला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कोरोना परिस्थितीतील नियोजन व तिसऱ्या लाटेच्या
अनुषंगाने करण्यात येत असलेली कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. या बैठकीस संबंधित
विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment