01 January, 2026
कापूस खरेदीदरम्यान सातबारा उताऱ्याबाबत दक्षता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
हिंगोली (जिमाका) दि. 01: हंगाम 2025-26 मधील कापूस खरेदीच्या अनुषंगाने भारतीय कापूस निगम लिमिटेड (सीसीआय) मार्फत हिंगोली जिल्ह्यात हमी दराने कापसाची खरेदी दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पासून नियमितपणे सुरू आहे. या कापूस खरेदी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांकडून सातबारा उतारा आवश्यक असून, या संदर्भात शेतकरी बांधवांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
कापूस खरेदीच्या वेळी सातबारा उताऱ्याचा वापर करण्यात येत असल्याने कोणत्याही अडतदार, व्यापारी, एजंट किंवा इतर मध्यस्थ व्यक्तीस आपला सातबारा उतारा देऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सातबारा उतारा इतरांच्या हाती गेल्यास त्यामध्ये बोगस संपादन (एडिटिंग) करून गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला सातबारा उतारा केवळ अधिकृत खरेदी केंद्रावर आणि अधिकृत कर्मचाऱ्यांनाच सादर करावा, असे जिल्हा प्रशासनाने नमूद केले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या सूचनांचे पालन करून सुरक्षित व पारदर्शक कापूस खरेदी प्रक्रियेस सहकार्य करावे, असेही जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
**
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment