14 January, 2026

श्री गुरु तेग बहादुर साहिब : सत्य आणि मानवतेचा अमर संदेश

 


भारतीय इतिहासात काही अशी महान व्यक्तिमत्त्वे आहेत, ज्यांचे कार्य आणि विचार केवळ एका धर्मापुरते मर्यादित न राहता संपूर्ण मानवजातीसाठी दिशादर्शक ठरले आहेत. अशाच महान संतांपैकी एक म्हणजे शीख धर्मातील नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिब. शांत, साधे, संयमी आणि अत्यंत दयाळू स्वभावाचे असलेले गुरु तेग बहादुर साहिब हे सत्य, प्रेम, सहिष्णुता आणि मानवतेचे मूर्तिमंत प्रतीक होते. कोणाच्याही भावना दुखावू नयेत, सर्वांनी परस्पर सन्मान राखून शांततेने आणि सौहार्दाने एकत्र राहावे, हाच त्यांच्या शिकवणीचा गाभा होता.

श्री गुरु तेग बहादुर साहिब यांचा जन्म 1 एप्रिल 1621 रोजी अमृतसर येथे झाला. ते शीख धर्माचे सहावे गुरु श्री गुरु हरगोबिंद साहिब आणि माता नानकी यांचे सुपुत्र होते. लहानपणापासूनच त्यांचा स्वभाव अत्यंत शांत, गंभीर आणि विचारशील होता. ध्यान, प्रार्थना आणि सेवा यांमध्ये त्यांना विशेष रस होता. सांसारिक आकर्षणांपेक्षा आध्यात्मिक जीवनाकडे त्यांचा कल अधिक होता. ते फारसे बोलत नसत; मात्र जे बोलत, ते नेहमी मनापासून आणि सत्य असायचे. त्यांच्या या स्वभावामुळे लोक त्यांचा अत्यंत आदर करत आणि त्यांच्या वर्तनातून प्रेरणा घेत.

इ.स. 1664 मध्ये श्री गुरु तेग बहादुर साहिब यांना शीख धर्माच्या गुरु पदाची जबाबदारी मिळाली. गुरु झाल्यानंतर त्यांनी भारतातील विविध भागांत व्यापक प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी सामान्य जनतेशी संवाद साधत जीवनमूल्यांची शिकवण दिली. खरे बोलणे, साधे आणि प्रामाणिक जीवन जगणे, परिश्रम आणि सेवा करणे, तसेच सर्व माणसांशी समानतेने वागणे यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यांच्या मते, समाजात कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते; सर्व मानव समान आहेत आणि प्रत्येकाने प्रेम, आदर व करुणेने एकमेकांशी वागले पाहिजे.

त्या काळात धार्मिक कारणांवरून मोठ्या प्रमाणावर अन्याय होत होता. अनेकांना त्यांच्या श्रद्धेमुळे छळ सहन करावा लागत होता आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याचे प्रकारही घडत होते. ही परिस्थिती पाहून श्री गुरु तेग बहादुर साहिब अत्यंत व्यथित झाले. त्यांनी ठामपणे मांडले की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या श्रद्धेनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणावरही धर्म लादता येत नाही किंवा कोणालाही जबरदस्तीने धर्म बदलायला भाग पाडता येत नाही. धर्मस्वातंत्र्याचा हा विचार त्यांनी निर्भयपणे मांडला आणि तो आजही तितकाच महत्त्वाचा व मार्गदर्शक आहे.

सत्य आणि मानवतेच्या रक्षणासाठी श्री गुरु तेग बहादुर साहिब यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी इतरांच्या हक्कांसाठी उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांचे बलिदान कोणाविरुद्ध नव्हते, तर संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी होते. त्यामुळेच संपूर्ण देशाने त्यांना प्रेमाने आणि सन्मानाने “हिंद की चादर” ही गौरवशाली उपाधी दिली. त्यांचे बलिदान हे धर्मस्वातंत्र्य, सहिष्णुता आणि मानवतेच्या विजयाचे प्रतीक मानले जाते.

गुरु तेग बहादुर साहिब यांच्या महान बलिदानाच्या 350 व्या शहिदी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने ‘हिंद दी चादर’ हा महत्त्वाकांक्षी राज्यस्तरीय उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा उद्देश गुरु तेग बहादुर साहिब यांचे जीवन, विचार आणि बलिदान केवळ धार्मिक चौकटीत न ठेवता सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय प्रेरणा म्हणून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. धर्मस्वातंत्र्य, सहिष्णुता, विविधतेतील एकात्मता आणि मानवतेचा सन्मान ही मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे.

या उपक्रमाच्या अंमलबजावणीत शीख समाजासह गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ऐतिहासिक कार्याचे साक्षीदार आणि गुरु ग्रंथ साहिबमध्ये उल्लेख असलेले सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकि, भगत नामदेव तसेच उदासीन समाज-संप्रदाय सक्रियपणे सहभागी होत आहेत. शासनाच्या या पुढाकारामुळे इतिहासातील हा तेजस्वी अध्याय केवळ स्मरणापुरता न राहता समाजाच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

‘हिंद दी चादर’ उपक्रमांतर्गत राज्यभर विविध स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. गुरु तेग बहादुर साहिब यांच्या स्मृती जपण्यासाठी विशेष टपाल तिकीट आणि विशेष नाणे जारी करण्यात आले आहे. तसेच त्या काळातील ऐतिहासिक शस्त्रे, दस्तऐवज आणि सांस्कृतिक वारसा मांडणारी प्रदर्शने आयोजित करण्यात येत आहेत. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि विविध समाजघटकांच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम, चर्चासत्रे आणि सांस्कृतिक सादरीकरणे राबवली जात आहेत.

या राज्यस्तरीय उपक्रमाची सुरुवात 7 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथे झालेल्या भव्य कार्यक्रमाने झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम सामाजिक एकात्मतेचे प्रभावी प्रतीक ठरला. यानंतर 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथे आणि 18 व 19 फेब्रुवारी 2026 रोजी नवी मुंबई येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सर्व उपक्रमांचा एकत्रित परिणाम असा होईल की, गुरु तेग बहादुर साहिब यांचा इतिहास पुस्तकांपुरता मर्यादित न राहता सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडला जाईल. महाराष्ट्र शासनाच्या या व्यापक प्रयत्नांमुळे गुरु तेग बहादुर साहिब हे संपूर्ण भारतीय समाजासाठी धर्मस्वातंत्र्य, सहिष्णुता आणि मानवतेचे कालातीत प्रतीक म्हणून नव्या पिढीच्या मनात अढळ स्थान मिळवतील. हीच त्यांच्या महान बलिदानाला खरी आदरांजली ठरेल.

*संकलन- जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग*

0000000

No comments: