05 October, 2026

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनासाठी आरोग्य संस्थांनी प्राधान्याने कामे पूर्ण करावीत - मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनासाठी आरोग्य संस्थांनी प्राधान्याने कामे पूर्ण करावीत - मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड 
हिंगोली, (दि. ५ ऑक्टोंबर ) 
जिल्ह्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ५० आरोग्य उपकेंद्रे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (एनक्वॉस) प्राप्त करण्यासाठी आवश्यक निर्देशांकांनुसार पायाभूत सुविधा, सेवा गुणवत्ता आणि रुग्णाभिमुख कार्यपद्धतीत सुधारणा करून सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या व्हिडिओ कॉन्फरन्स सभागृहात आज मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची स्वतंत्र आढावा बैठक दूरदृश्य प्रणाली द्वारे घेण्यात आली. 

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, प्रशासकीय अधिकारी विठ्ठल भुसारे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रशांत पुठावार हे प्रत्यक्ष तर सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी आणि सर्व समुदाय आरोग्य अधिकारी दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.
या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन प्राप्त करण्यासाठी सर्व आरोग्य संस्थांनी जबाबदारीने व नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याच्या सूचना दिल्या. आवश्यक पायाभूत सुविधा, दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल परंतु विनाकारण प्रस्ताव सादर न करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले.
 
या बैठकीत बाह्यरुग्ण विभाग, प्रसूती सेवा, प्रयोगशाळा, औषध भांडार, रुग्णालयातील विविध आरोग्य सुविधा, स्वच्छता व्यवस्थापन, मनुष्यबळ उपलब्धता तसेच वैद्यकीय यंत्रणेच्या एकूण कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रुग्णांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व स्तरांवर समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिल्या.
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन प्रक्रियेच्या प्रगतीचा नियमित आढावा दर सोमवारी घेण्यात येणार  असून सर्वांनी यानंतर कामांमध्ये सुधारणा न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे सक्त निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले.
00000

No comments: